नागरिकांचे हाल होतांना ठेकेदाराचे लाड कशासाठी ?

0

जळगाव (Jalgaon) शहरात एकच विषय चर्चेचा बनलाय तो म्हणजे शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचा विलंब. या पुलाचे बांधकाम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते. ते झाले नाही. त्यासाठी सहा सहा महिन्याची दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. 22 फेबु्रवारी 2022 रोजी आता या पुलाचे काम पूर्ण व्हायला हवे होते. तथापि अद्याप पुलाचे 30 टक्के काम होणे बाकी आहे. म्हणजे अजून किमान सहा महिने कालावधी लागणार आहे. गेले तीन वर्षे या पुलाअभावी शिवाजीनगरची जनता हा त्रास सहन करीत आहे. जीव मुठीत घेऊन रेल्वे रूळावरून हे लोक प्रवास करतात. या पुलाच्या बांधकामास होणाऱ्या विलंबाबत ठेकेदार श्री श्री कन्टस्ट्रक्शन कंपनीच्या वतीने अनेक कारणे देण्यात आली. तथापि वर्षभराची मुदत वाढवून दिली असतांनाही ठेकेदाराकडून पुलाचे काम पूर्ण झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा प्रत्यक्ष पुल बांधकामस्थळी भेट देऊन पहाणी केली. वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. परंतु त्याचा ठेकेदारावर काहीही परिणाम झाला नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी अनेकवेळा पुलाच्या बांधकाम स्थळी जाऊन तेथील अधिकारी, कमर्चारी यांचेशी चर्चा केली. त्यानंतर या पुलाचे ठेकेदार श्री श्री कन्स्ट्रक्शनचे संचालक आदित्य खटोड यांचेशी सुद्धा चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन शिवाजीनगर वासीयांची पुलासंदर्भात व्यथा मांडली. आतातर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर पुलाचे ठेकेदार श्री श्री कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली. सोशल मिडियावर जिकडे तिकडे शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या विलंबाच्याच चर्चेला उधाण आले आहे. 10 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तथापि 18 दिवस उलटून गेले तरी बांधकाम विभागाने कसली कारवाई केली हे अद्याप जाहीर झाले नाही. दंडात्मक कारवाई करावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना जनतेकडून करण्यात आल्या. तथापि बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून निविदा मंजूर झाली तेव्हा त्यातील अटी शर्थी काय होत्या याची माहिती मिळविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बांधकाम खाते, आणि त्यांचे सक्षम अधिकारी. पूल बांधकामाला सहा सहा महिन्याची मुदत वाढवून दिल्यानंतर अद्याप काम अपूर्ण असतांना आमचे बांधकाम खात्याचे अधिकारी आता निविदेतील अटी शर्थीचा अभ्यास करताहेत. धन्य ते बांधकाम खाते आणि त्यांचे अधिकारी.

परवाच जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेट उड्डाण पुलाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेहस्ते पार पडला. याप्रसंगी आपल्या भाषणात मुदतीच्या आत या पुलाचे बांधकाम पूर्ण करा. कारण शिवाजीनगर उड्डाण पुलासारखे याचे काम रखडायला नको. त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 18 महिन्याचा कालावधी पूर्णत्वासाठी देण्यात आला आहे. परंतु 12 ते 15 महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होईल. एकीकडे भूमिपूजन सोहळा होत असतांना दुसरीकडे पुलाच्या बांधकामाचे कामसुध्दा सुरू झाले होते ही विशेष महत्वाची बाब म्हणता येईल. याचा अर्थ भूमिपूजन सोहळा हा एक औपचारिकता म्हणून करण्यात आला. प्रत्यक्षात कामाला महत्वाचे स्थान देण्यात आले हे विशेष होय. योगायोगाने या भूमिपूजन सोहळ्याला जळगावचे आमदार राजूमामा भोळे हेही उपस्थित होते. त्यांच्याच कालावधीत तसेच त्यांच्या पत्नी जळगाव महानगरपालिकेच्या महापौर असतांना शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरू झाले होते.

दोन वर्षाच्या मुदतीत शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही ही खंत व्यक्त केली. परंतु गेल्या तीन वर्षेात शहराचे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून कधीही आवाज उठवला नाही. जळगाव शहराच्या नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार राजूमामा भोळे यांनी शिवाजीनगरवासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल कधी खंत व्यक्त केली काय? याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. दरम्यान महापालिकेत भाजपची सत्ता जाऊन शिवसेना सत्तेवर आली. शिवाजीननगर उड्डाण पुलाच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि ठेकेदार याची मिलीभगत नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होतो आणि तो रास्त आहे. तसेच श्रीश्री कन्स्ट्रक्शनचे हात वरपर्यंत पोहोचले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आमचे काही वाकडे होऊ शकत नाही असे ठेकेदाराचे म्हणणे आहे असे बोलले जाते. ठेकेदार हा पूर्वाश्रमीच्या सत्ताधारी भाजपशी संबंधित असल्यामुळे हम करेसो कायद्याप्रमाणे वागत आहे. परंतु सदर ठेकेदारावर कारवाई करून त्याची जागा दाखवून द्यावी असे जळगावकर जनतेला वाटते. त्यासाठी जळगाववासियांच्या भावनेचा विचार व्हावा. एवढीच या निमित्ताने मागणी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.