सलोख्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर जास्त

0

लोकशाही संपादकीय लेख

दिनांक 22 जुलै रोजी मुक्ताईनगर मध्ये प्रवर्तन या मुख्य चौकात शेकडो जनसमुदायाच्या उपस्थितीत राडा झाला. सोशल मीडियावर मुलीचे फोटो व्हायरल केल्याचा राग दोन महिलांनी अमीन नावाच्या व्यक्तीला चोप देऊन व्यक्त केला. अमीनला मारहाण होत असताना तिथे जमलेल्या शेकडोच्या जमावाने बघ्याची भूमिका घेतली. किंबहुना जमावाने कडे करून जणू या महिलांना मुक्त मारहाण करण्याची संधीच दिली होती. ही बाब समाज म्हणून लांचनास्पद आहे. मला मारून टाका असे मारहाण होत असलेला व्यक्ती ओरडत असताना, जमावापैकी कोणीही त्याला हस्तक्षेप करावा असे वाटले नाही. हे माणुसकीला शोभण्यासारखे नाही. कोण चूक कोण बरोबर हा प्रश्न नंतरचा असला तरी पोलीस घटनास्थळी येईपर्यंत त्या व्यक्तीला मारले जात होते. उलट काही पुरुष मंडळींकडून त्याला प्रोत्साहन दिले जात होते. त्यांच्याकडूनही त्याला मारहाण झाली.

मारहाण करणाऱ्या दोन्ही महिला आणि पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ते करीत आहेत. तथापि या प्रकरणात राजकीय वास येतोच येतोय एवढे मात्र निश्चित. याला कारण मुक्ताईनगर पंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक एवढेच. शिंदे गटाच्या महाराष्ट्रात पहिल्या नगराध्यक्ष होणार म्हणून मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकात आमदार चंद्रकांत पाटील अर्थात शिंदे समर्थकांकडून फटाके फोडले जात होते. दुर्दैवाने नगराध्यक्षपदाची निवडणूकच उच्च न्यायालयाकडून रद्द केली गेली. त्यानंतर चौकात जमलेल्या समर्थकांमध्ये निराशा पसरली. आणि त्याच चौकात अमीन नावाचा व्यक्ती योगायोगाने तिथे होता. 21 तारखेला मुलीचा फोटो व्हायरल केल्याचा राग त्याच्यावर होताच. तिथे त्या दोन्ही महिलांना हा दिसला आणि त्यांनी मारहाणीचा राडा केला. तिथे जमलेल्या जमावावर नगराध्यक्ष निवडणुकीला स्थगिती मिळाल्यामुळे नैराश्य पसरले होते. त्याचा परिणाम या मारहाणीत झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मुक्ताईनगर मधील नागरिक गुणागोविंदाने राहणारे म्हणून ओळखले जातात. गेल्या पंचवीस तीस वर्षात मुक्ताईनगरमध्ये शांततेचा भंग झालाय. अशा घटना झाल्या नाहीत. सर्व समाजाचे धर्माचे लोक एकमेकांशी आपुलकीने राहतात. परंतु गेल्या अडीच तीन वर्षापासून मुक्ताईनगरचे वातावरण गढूळ होत असताना दिसते. सहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला झाला होता. हल्लेखोरांची नावे त्यांनी सांगितली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे मात्र खरे आहे. त्यानंतर कालची घटना झाली. यासंदर्भात सुद्धा राजकीय गटबाजीचा वास येतोय. आम्ही या व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करा, या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर या मांडून घोषणाबाजी करण्यात रोहिणी खडसेंसह अमीनचे नातेवाईक आदी खडसे समर्थक कार्यकर्ते होते.

लोकशाहीमध्ये रीतसर मार्गाने न्याय मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, तो त्यांना तो त्यांनी शांततेच्या मार्गाने केला. तथापि याबाबत गुन्हे दाखल होण्याआधीच आरोपीला अटक करा, म्हणून राजकीय इव्हेंट केला. हे आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेले संशोधन मात्र खटकणारे आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या जनतेच्या प्रति जे काही आंदोलन करतात त्याला राजकीय इव्हेंट म्हणून त्याची निर्भसना करणे, एक दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला अशोभनीय असे आहे. यामुळे समाज समाजात वेगळा संदेश जातो. याचे भान राजकीय नेत्यांनी बाळगले पाहिजे. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्या दोघांमध्ये जणू विळा भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे या दोघे नेत्यांवर मुक्ताईनगर मध्ये राजकीय सलोखा निर्माण करण्याची मोठी जबाबदारी आहे.

राजकीय नेते मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी समर्थक कार्यकर्त्यांचा उपयोग करून घेतात. त्यात नाहक कार्यकर्ते भरडले जातात. मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांनी शांतता समितीची बैठक बोलवून चांगले प्रबोधन केले. शांतता बिघडविण्याचा कुणी प्रयत्न करू नये, तसा कोणी प्रयत्न केला तर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल. त्यानंतर अनेक लोकांना जेलची हवा खावी लागेल, असा दम दिला गेला. आता दोन दिवसानंतर कवित्व संपले आहे. शांतता प्रस्थापित झाली आहे. दोन दिवसानंतर अमीनवर मारहाण करणाऱ्या महिलांनी सुद्धा अमीनच्या विरोधात गंभीर स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीतील काही आरोप व्हिडिओमध्ये दिसत नसले, तरी त्यांच्या फिर्यादीची दखल घेऊन गुन्हा दाखल करून पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांनी देऊन या बाबीची निपक्षपणे चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. आता त्यांच्या चौकशीत राजकीय नेत्यांनी काही खोडा घालू नये, एवढीच अपेक्षा..!

Leave A Reply

Your email address will not be published.