ग. स. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा हायहोल्टेज ड्रामा

0

आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी पतपेढी अर्थात सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चांगलेच नाट्य रंगले. ग. स.च्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. सहकारला 9, लोकसहकारला 6 आणि प्रगती शिक्षक सेना पॅनलचे 6 संचालक निवडून आल्याने कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सहकार गटाला 9 जागा मिळाल्याने तो सर्वात मोठा गट असला तरी बहुमताचा जादुई आकडा वाढण्यासाठी त्यांना दोन सदस्यांची गरज होती. 30 एप्रिलला संचालक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर गेले बारा दिवस तिन्ही गटांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षच्या निवडणुकीचा खेळ चालू होता.

सहकार गटाला जरी सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी लोक सहकार आणि प्रगती शिक्षक सेना हे दोन्ही गट एकत्र येऊन अध्यक्ष उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे राहील, सहकारला नऊ जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना विरोधात बसावे लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. तथापि यावेळी सहकार गटाचे अनुभवी नेते उदय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगळी खेळी खेळली आणि लोकसहकार गटाचे सदस्य फोडून बहुमतासाठी हवा असणारा 11 सदस्यांचा जादुई आकडा पूर्ण केला. त्यामुळे सहकार गटाचे नेते उदय पाटील आणि लोकसहकार गटाचे सदस्य रवींद्र सोनवणे यांना उपाध्यक्ष पद देऊ केल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी चांगलाच वाद विकोपाला गेला.

ग. स.च्या मुख्य कार्यालयात झालेल्या या निवडणुकीच्या निर्णय अधिकारपदी जिल्हा उपनिबंधक संतोष बीडवई हे होते. तथापि अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया चालू असताना दोन सदस्य फुटल्यामुळे सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन कमालीचा गोंधळ घातला गेला. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असे वाटल्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस संरक्षणात अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड घोषित झाली. सहकार गटाचे उदय पाटील आणि लोकसहकार गटाचे सदस्य रवींद्र पाटील यांना अनुक्रमे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी अकरा मते मिळाली आणि ते विजयी झाले. तर प्रगती शिक्षक पॅनलचे रावसाहेब मांगो पाटील आणि लोकसहकार गटाचे अनिल कौतिक पाटील यांना अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी पडलेली दहा मते मिळून एक मताने ते पराभूत झाले.

आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी सहकारी पतपेढी असलेल्या सरकारी नोकरांच्या या पतपेढीत नेहमीच अशा प्रकारचे वाद निर्माण होतात. सुमारे छत्तीस हजारापेक्षा जास्त सदस्य असलेल्या या पतपेढीत सर्व मतदार सुशिक्षित आहेत. निम्म्यापेक्षा जास्त सदस्य संख्या शिक्षकांची आहे, परंतु अशा परिस्थितीतही निवडणुकीच्या रणांगणात पैसे घेऊन मतदान केल्याचा आरोप केला जातो. आताच्या निवडणुकीची एकूण पाच पॅनल निवडणूक रिंगणात होते. निवडणूक प्रचार शिगेला पोचला होता. निवडणुकी प्रचारात एका पॅनल कडून मतदारांना साड्या वाटण्यात आल्याचा आरोप केला गेला. पैशाचे आमिष देऊन मतदान पदरात पाडण्याचा प्रयत्न झाला आणि अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तर एका गटाचे दोन सदस्य फोडण्यासाठी लाखोंची उलाढाल झाली, असा आरोप विरोधकांकडून केला गेला.

सुशिक्षित मतदारांमध्ये हे चाललेले नाट्य पाहून मन खिन्न होते. त्यातल्या त्यात विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांकडून पैसे घेऊन मतदान करणे हे लांच्छनास्पद म्हटले पाहिजे. अशा शिक्षकाकडून विद्यार्थ्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा ? असो सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी ही संस्था पैसे कमवण्याचे साधन आहे काय ? अध्यक्षपदाच्या दोन मतासाठी लाखो रुपये दिले गेले असतील तर हे पैसे आले कुठून ? एवढे लाखो रुपये दिल्यानंतर याची भरपाई करणार कशी ? ग. स. पतपेढीतून या पैशाची कमाई केली जाणार यात शंका घेण्याचे कारण नाही. पतपेढीत करावयाची नोकर भरती त्यातून कोट्यवधी रुपये काढले जातात, असे बोलले जाते, अथवा असे आरोप केले जातात त्यात तथ्यांश आहे असेच म्हणावे लागते.

कर्मचाऱ्यांसाठी फर्निचर खरेदीत भ्रष्टाचार केल्यावरून संचालक मंडळात वाद निर्माण झाला हे सर्वश्रुत आहे. याचा अर्थ निकृष्ट दर्जाचे फर्निचर खरेदी करून पैसे कमविले गेले तर हे अशोभनीय आहे. आज झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत सदस्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप सहकार गटाचे नेते आणि नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांनी केला. इतकेच नव्हे तर मला घरी जाईपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे अशी पोलीस अधिकार्यांकडे मागणी केली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असे राजकारण चालते म्हणून आपण टीका करत होतो. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात झालेला हा प्रचार निंदनीय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.