उड्डाणपूल दिरंगाईची गिनीज बुकात नोंद करा

0

जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या दिरंगाईची आता गिनीज बुकात नोंद होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 12 फेब्रुवारी 2019 ला या उड्डाणपुलाची वर्क ऑर्डर जळगावचे ठेकेदार श्री श्री कन्स्ट्रक्शनला देण्यात आली होती. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2021 ला हा उड्डाण पूल तयार होऊन लोकांच्या सेवेत रुजू व्हायला हवा होता. परंतु सहा सहा महिन्यांची दोनदा अधिकृत वाढ मंजुरी देण्यात आली. म्हणजे 12 फेब्रुवारी 2022 ला दोनदा देण्यात आलेल्या वाढीची मुदत संपली आहे. आता तिसऱ्यांदा अतिरिक्त मुदतवाढ चालू आहे. मुदत संपून दोन महिने झाले, तरी पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मजूर कामावर येत नाहीत, असे सांगितले जाते. या संथगतीने जरी काम केले तरी जून पर्यंत पुलाचे लोकार्पण होऊ शकते. तथापि यापेक्षाही संथगतीने काम केले तर पावसाळ्यात पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकते.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दिरंगाईचा महाराष्ट्रात एक वेगळाच आदर्श निर्माण झाला आहे. या उड्डाणपुलाच्या दिरंगाईमुळे शिवाजीनगर तसेच या भागातील ग्रामीण जनतेचे कमालीचे हाल होत आहेत. परंतु त्याचे कोणालाही देणेघेणे नाही. ठेकेदार म्हणतो, आमचे काही वाकडे होऊ शकत नाही. कारण शहराचे दोन आमदार, काही वजनदार नगरसेवक तसेच माजी पालकमंत्री आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे जोपर्यंत ही मंडळी आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आम्हाला कसली चिंता नाही.

वृत्तपत्रांमध्ये, सोशल मीडियामध्ये सर्वाधिक टीकाटिप्पणी शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या दिरंगाई संदर्भात झाली आहे, आणि अजून होत आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय नेत्यांना, त्यांना मते देऊन निवडून देणाऱ्या जनतेपेक्षा एकटा ठेकेदार महत्त्वाचा वाटतो. गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाण पुलावरून होणारी वाहतूक बंद असल्यामुळे मोठ्या फेर्याने आणि वाहतुकीच्या कोंडीतून शहरात यावे लागते. सुदैवाने कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचला. परंतु आता कोरोना महामारी संपुष्टात आल्याने शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली असून, लहान लहान बालकांना ऑटोरिक्षा मधून, स्कूल बस मधून, अथवा स्वतःच्या वाहनाने शाळेत पोहोचण्यासाठी जे द्राविडी प्राणायाम करावे लागते, जो भार सहन करावा लागतो त्याची खरी किंमत विद्यार्थ्यांच्या पालकांना मोजावी लागते आहे.

शिवाजीनगर वासियांना तसेच जळगाव शहर वासियांना होणाऱ्या त्रासाची चर्चा आता फार झाली आहे. शासनाचे अधिकारी गेंड्याची कातडी पांघरून बसलेले आहेत. त्यांना ज्या कामाचा पगार दिला जातो, ते काम त्यांनी केले काय अन नाही केले काय; पगार मिळणारच.. म्हणून त्यांना त्याचे काहीही वाटत नाही. फारच झाले तर बदली होऊ शकते. ती ही झाली तर झाली.. या मानसिकतेत हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत काही देणेघेणे नाही. राहता राहिले जनतेचे, तर प्रतिनिधित्व करणारे मायबाप म्हणजे ज्यांच्या मतांच्या जोरावर जे लोकप्रतिनिधी निवडून जातात ते निवडून गेल्यानंतर पाच वर्षे म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीत्वाचा कालावधी संपेपर्यंत त्यांनाही देणेघेणे नाही. त्यामुळे जळगाव शहरातून निवडून आलेले आमदार राजूमामा भोळे तसेच विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे चंदूभाई पाटील यांनी जळगावच्या जनतेला जणू वाऱ्यावर सोडले आहे.

महापालिकेत निवडून आलेले सर्व नगरसेवक गप्प आहेत. या सर्व प्रकारावर आता प्रकाशझोत टाकण्यासाठी शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दिरंगाईची कथा अख्ख्या महाराष्ट्राला पडलेले कोडेच म्हणावे लागेल. कुणाचे चुकते हेच कळत नाही या सर्व प्रकाराने जनता मात्र भरडली जाते आहे. त्यासाठी शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामाच्या दिरंगाईची गिनीज बुकात नोंद करण्यात यावी, असे खेदाने म्हणण्याची वेळ आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.