Saturday, January 28, 2023

सर्वेपि सुखिनः सर्वे सन्तु निरामय ।

- Advertisement -

करुणाष्टक – 22

किती योगमूर्ती किती पूण्यमूर्ती I किती धर्मसंस्थापना अन्नशांती II पस्तावलो कावलो तप्त जालों I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II

एकूणच नरदेहाच दुर्लभ महत्त्व आपल्याला पटलं तर आपण स्वतःसाठीच सत्य बोलु, धर्मानं वागुन थोडा परोपकार करू, आपल्या स्वरूपाची ओळख करून घेऊ, भगवंताकडे जाण्याच्या दिशेने काही पाऊल उचलून प्रयत्न करू व या भरतखंडात आपल्याला जन्म लाभला हे भाग्य समजू. संत एकनाथ ही म्हणतात, “भारत खंडे नरदेह प्राप्ती” ही तर भाग्याची संपत्ती कारण आपल्याकडे अध्यात्माचा जसा सुक्ष्म विचार झाला, इतके श्रेष्ठ आचार्य, द्रष्टे महामुनी, आत्मोन्नती केलेले आणि आत्मसाक्षात्कार झालेले संत निर्माण झाले तसे जगाच्या इतर कोणत्याही देशामध्ये झालेले नाहीत.

- Advertisement -

समर्थांना आपल्या या भाग्याची कल्पना होती व आपणही एक भाग्यवंत व्हावे हा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून ते म्हणतात, किती योगमुर्ती, पुण्यमूर्ती !! अरे, शुक्राचार्यां सारखे वैराग्य असलेले योगी येथे झाले. तर जनक राजा सारखे राज्यपद भोगत असतानाही आत्म विवेकं निवडलेले महात्मे या पवित्र भूमीत आदर्श म्हणून झाले. ज्ञानी झाले आणि आपलं तप सिद्धीस नेऊन सगळ्या जगाला मान्यवर असे कविश्रेष्ठ वाल्मिकी ऋषी ही याच भूमीत झाले.

केवळ योगी, भक्त, ज्ञानीच झाले असे नाही कितीतरी सत्वगुणी प्रापंचिक माणसं झाली की ज्यांनी ईश्वरावर अधिक प्रेम केले. ज्या मंडळींनी घोडे, हत्ती, गाय, जमीन, रत्ने यांची दानं दिली. ब्राह्मण भोजने घातली, सहस्त्र भोजन, लक्ष भोजने घातली ती ही निष्काम भावनेने. तीर्थाच्या ठिकाणी तलाव, सरोवरे, देऊळे बांधली. नदी तीरी संदेश साठी मठ बांधले, भुयार तयार केले, घाट बांधले, देवालयात सुंदर अशी पूजा साहित्याची भांडी दिली. देवालयात सुंदर कोठ्या, स्वयंपाक घर बांधली काया-वाचा-मने करून निष्कामतेने देवाचे भजन केले. तिथी, पर्वणी, नित्यनैमितीक उत्सव, महोत्सव यावेळेस आवडीने सेवा करणाऱ्या अनेक “पुण्यमूर्ती” ही झाल्या.

ज्यांच्या विचारांची बैठक परउपकार करणे म्हणजे पुण्य व दुसऱ्याला पीडा करणे म्हणजे पाप अशीच होती. अशा योगमुर्तिंनी, पुण्यमुर्तिंनी ही पृथ्वी सनाथ झालेली पाहून समर्थांना त्याचा अभिमान वाटतो व धर्मसंस्थापनासाठी जे नर काम करून गेले ते काम पुढेही होत राहिले पाहिजे हा त्यांचा मनोदय होता.” सर्वेपि सुखन: संन्तु I सर्वे संन्तु निरामया: II” ही लोककल्याणाची तळमळ संपूर्ण हिंदू संस्कृतीची आधार शिला आहे. धर्माचे स्वातंत्र्य असेल तर बाकीचे स्वातंत्र्य आपण घेऊ शकतो. श्रीमद् आद्य शंकराचार्य ही गुरूच्या आदेशानुसार धर्मसंस्थापना करण्यासाठी आचार्यांनी केरळ ते काश्मीर अशी भारत यात्रा किमान तीन वेळा केली. आपल्या बुद्धीबलाने भारत खंडातील सर्व विद्वानांना वादात पराभूत केले. प्रस्थानत्रयीवर, अद्वैतसिद्धांतावर विपुल ग्रंथ रचना केली. भक्तिपर स्तोत्रे लिहिली. बौद्धमताचा त्यांनी प्रभाव रोवला.

समर्थांच्या वेळेस पुन्हा एकदा समाज भयभीत, स्वतःवरचा विचार गमावलेला, दुर्बल, पराधीन व विस्कळीत झाला होता. हातून काही धर्माचे रक्षण घडावे असे कार्य करण्याची नितांत गरज होती. नुसता भक्तीचा पिंड नको होता तर धर्म-संस्थापना करण्याची, अन्नछत्र चालविण्याची आवश्यकता होती. समर्थ साशंक होऊन म्हणतात, “पस्तावलो, कावलो, तप्त झालो” रामभक्तीमध्ये देहभान हरपून गेलेले स्वामी रामदास आता येथे व्याकुळ झालेले दिसत आहेत. रामाची मनधरणी झाली, क्षमायाचना झाली. आता त्यांना आनंदवनभुवनाचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यांची आशा-आकांक्षा व त्यांचे भावविश्व त्यांनी खुल्या अंतःकरणाने समाज पुरुषाच्या हाती सोपविले आहे. स्वतःच्या वैयक्तिक मोक्षप्राप्तीसाठी त्यांनी प्रथम राम उपासना केली. रामाशी एकरुप झाल्यावर उरलेले आयुष्य त्यांनी “दास मी. भक्त मी” म्हणूनच व्यतीत केले.

राघवाच्या धर्माची संजीवनी प्राशवुन रामदासांनी समाजात नवचैतन्य, स्वत्व आणि पुरुषार्थाचे प्राणप्रतिष्ठा केली. धर्माला ज्याची नितांत आवश्यकता होती असा महाराष्ट्र धर्म त्यांनी घडविला. कल्याणाचा खरा व एकमेव मार्ग म्हणजे धर्म. अभ्युदय आणि नि:श्रेयस प्रपंच आणि परमार्थ या दोघांचीही सिद्धी धर्माशिवाय नाही असा समर्थांचा दृढ विश्वास होता. “देव मस्तकी धरावा I अवघा हलकल्लोळ करावा I मुलुख बडवा का बुडवावा धर्मस्थापनेसाठी II” धर्म आपले रक्षण करतो हे खरे पण त्यासाठी आपणही धर्माचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण संप्रदायाची व संघटनेची जडण-घडण विचारपूर्वक केली आहे म्हणून ‘धर्मकारण वा देवकारण’ आणि ‘राजकारण’ अशा दोन्ही अंगांनी त्यांनी महाराष्ट्र धर्माची मांडणी केली आहे.

1644 साली शिवाजी महाराजांना अनुग्रह देऊन धर्मस्थापना व हिंदू धर्माचे रक्षण करण्याची जाणीव करून दिली व महाराष्ट्र राजकारण हेच धर्मकारण ठरवून महाराजांच्या करवी हिंदू राष्ट्राचा पाया घालण्यासाठी मदत केली.

आजही कौटुंबिक- सामाजिक व राष्ट्रीय पातळीवरील विस्कळितपणा, अर्थकारणाची अरेरावी, राजकारण, पक्ष शिस्तीचा बडगा, धर्मकारणात अंधश्रद्धा, सर्वच क्षेत्रात दहशतवाद यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन असुरक्षित झाले आहे. खरे बोलण्याची व न्याय दिसेल ते करण्याची अडचण होत आहे. समर्थ रामदासांसारखा योगी, ज्ञानी, धर्मसंस्थापक या भारत भूमीला पुन्हा हवाय.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

shtak

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे