जळगाव : – दारु पिण्यासह मौजमस्तीसाठी जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी केलेल्या दुचाकी देवून टाकणाऱ्या दिलीप रामदास राठोड (वय ३०), अनिल शालीकराम चंडील (वय ३०, रा. टिटवी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) दोघांच्या रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश करीत मुसक्या आवळल्या. त्याच्यांकडून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
शहरातील आदर्श नगरातून दि. ४ एप्रिल रोजी धनंजय सुभाष परदेशी यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. दुचाकी चोरतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडन दुचाकी चोरट्यांचा शोध सुरु होता. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना संशयित हे छत्रपती संभाजी नगर येथील असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाला त्याठिकाणी पाठवले. या पथकाने दिलीप रामदास राठोड (वय ३०) याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने चोरलेल्या आठ दुचाकी काढून दिल्या. तसेच त्याचा साथीदार अनिल चंडौल याला देखील पथकाने ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन अशा एकूण दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे.
या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, सुशिल चौधरी, इरफान मलिक, पोना रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, हेमंत कळसकर, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, मनोज मराठे, दीपक वंजारी, निलेश बच्छाव यांच्या पथकाने केली.