पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या प्रदीप कुरूलकरला १५ मे पर्यंत कोठडी…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्या प्रकरणी १५ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुनावणी आज ९ मे रोजी नावंदर यांच्या कोर्टात पार पडली. या प्रकरणात वकिलांनी तपासाचा प्रगती अहवाल सादर केला आहे. गेल्या ३-४ दिवसात विविध साक्षीदार तपासण्यात आले आणि काही नवीन माहिती देखील समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून काही रिकव्हर केलेला डेटा प्राप्त झाला आहे. म्हणजेच आरोपीच्या मोबाईलवरून काही डेटा डिलीट करण्यात आला होता. आरोपींवर केलेले आरोप गंभीर असल्याने सदर डेटा तपासणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी सांगितलं.

जर ही कृत्य देशाच्या हितासाठी आणि विशेषतः देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक असतील तर तपास सर्व बाजूने करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे कोठडीत तपास करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच वरवर पाहता काही फोटो आणि काही डेटा आरोपीने परदेशी नागरिकासह शेअर केला आहे. आरोपीचे पद लक्षात घेता संवेदनशील डेटा शेअर करणे हे त्याच्याकडून राष्ट्रविरोधी कृत्य आहे असे म्हणता येईल असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान पाकिस्तानसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या कुरूलकर यांना शुक्रवारी डीआरडीओच्या संचालक पदावरून बडतर्फ करण्यात आले.

कुरूलकर हे २०२२ पासून पाकिस्तानी एजेंट्सच्या संपर्कात होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत पुण्यातून अटक केली होती. त्यांनी हनीट्रपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या महिला गुप्त एजेंटनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोपीशी संपर्क केला होता. तेव्हापासूनच व्हॉट्सअॅप मेसेज आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ते संपर्कात होते. एटीएस आधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत कुरुलकर यांनी महिलेशी व्हिडीओ चॅट केल्याचं मान्य केलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.