चारित्र्यावर संशय.. पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

औरंगाबादमधून (Aurangabad) एक संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. समीर विष्णु म्हस्के (रा. भाग्यनगर, बाबा पेट्रोलपंपाचे जवळ, औरंगाबाद) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, पत्नीचे आरती समीर मस्के तर मुलीचं निशात समीर मस्के नावं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. तो नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे अनेकदा त्यांच्यात वाद झाले. दरम्यान काल रात्री पुन्हा यावरून वाद झाला. त्यानंतर समीर मस्के यांनी घरातील नायलॉनच्या दोरी आणि मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळा आवळून हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून आरोपी समीर मस्के याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी समीरच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती मस्के यांच्या नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समीर याने आपली आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्या सांगण्यावर आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली आहे. समीरने आधी पत्नी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर आरतीचा व निशांतचा नायलॉनच्या दोरीने व वायरने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी समीर विष्णु म्हस्के आणि त्याची आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.