सरपंच व ग्रामपंचायत सदस्याची मुजोरी : कर्मचाऱ्याला डावलण्याचा प्रकार

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नाडगाव ता. बोदवड येथील नवनियुक्त सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य येथील ग्रामपंचायत मधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जातीय द्वेषापोटी कामावरून कमी करण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत येथे कार्यरत संगणक परिचालक यांनी या विरोधात आजपर्यंत अकरा वेळा तक्रार करून देखील कुठलीही दखल घेतली नसल्याचेही समोर आले आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे चंद्रशेखर तायडे हे संगणक परिचालक म्हणून 10 जानेवारी 2020 पासून रुजू आहेत. मात्र नवनियुक्त सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यापासून ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जातीय द्वेषापोटी कामावरून कमी करण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच ग्रामपंचायतच्या कोणत्याही मासिक मीटिंग अथवा ग्रामसभेला मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कमी करण्यासंदर्भात कुठलाही विषय न ठेवता, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक हे परस्पर निर्णय घेऊन कर्मचारी कमी करण्यासंदर्भात ठराव करत आहेत.

ग्रामपंचायत सदस्य सुभाष इंगळे यांनी त्यांच्या मुलाला संगणक परिचालक पदी नेमणूक मिळावी म्हणून चंद्रकांत तायडे यांच्याविरुद्ध आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करून त्यांच्या मुलाला संगणक परिचालक पदी लावण्यासंदर्भात पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे कार्यालयीन पत्र व्यवहार देखील केला होता.

दरम्यान गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांनी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार सदर प्रकरणी आपली बाजू व म्हणणे मांडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून त्यांना ही संधी प्राप्त होऊ शकली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

परिणामी चंद्रशेखर तायडे यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय देखील प्रशासन घेत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात निर्णय प्रक्रिया सुरू असताना संगणक परिचालक पदाकरिता ग्रामपंचायत सदस्य यांच्या मुलाला जिल्हा परिषद जळगाव येथे परीक्षेसाठी बसवण्यात आले होते. मात्र ही परीक्षा बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी चंद्रशेखर तायडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे चार वेळा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे चार वेळा, ग्रामसेवक ग्रामपंचायत नडगाव ता. बोदवड यांच्याकडे दोन वेळा तर ग्रामपंचायत सदस्य नाडगाव ता. बोदवड यांच्याकडे एक वेळा, अशी तब्बल ११ वेळा लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप त्यावर कोणताही विचार न करता सदर समस्येकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकरा वेळा केलेल्या तक्रारीचा तटस्थपणे विचार करत योग्य ती चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नाडगाव तालुका बोदवड येथील ग्रामपंचायत संगणक परिचालक चंद्रशेखर तायडे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.