धरणगावकरांचा वनवास संपणार…!

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव ग्रामीण विधानसभा हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मतदारसंघ. या मतदारसंघात धरणगाव (Dharangaon) शहरासह तालुक्याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा खाते आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. मधला 2019 ते 2014 या पाच वर्षाच्या कालावधी सोडला तर ते सतत चौथ्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु धरणगाव शहराच्या शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या तेच सोडवू शकले नाहीत. धरणगावकरांना महिन्यातून दोन वेळाच पिण्याचे पाणी नळाद्वारे मिळत होते. या दिवाळीपासून आठ नऊ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो. पिण्याच्या पाण्यासाठी धरणगावकरांची होणारी दैनाअवस्था विचित्र होती आणि आहे, म्हणता येईल. महिन्यातून दोन वेळा म्हणजे पंधरा दिवसात एकदा धरणगाव शहरवासींना पाणी मिळत होते. पंधरा दिवसांचे हे रोटेशन काही कारणास्तव चुकले, तर पाण्यासाठी हलकल्लोळ निर्माण होत होता. अनेक वेळा गुलाबराव पाटलांचा मोर्चाद्वारे धिक्कार केला जायचा. पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या धरणगावकरांसमोर गत्यंतर नव्हते. एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव साजरा करत असताना 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्लक्ष असावे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब म्हणता येईल. प्रत्येक आदिवासी पाड्यात पिण्याचे पाणी पोहोचवण्यात आल्याचे एकीकडे सांगून शासन स्वतःची पाठ थोपटून घेत असले, तरी तालुक्याच्या ठिकाणी 15 दिवसातून एकदा पाणी मिळते, ही शरमेची बाब नव्हे काय? अवघ्या पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर तापी नदी असताना, तापी नदीत मुबलक पाणी असताना ते पाणी धरावंगावकरांना देण्यातील अडचणी काय? या प्रश्नांचा अंतर्मुख होऊन कोणी विचार केला नाही. नियोजनाचे गणित कुठे चुकले, याचा लोकप्रतिनिधींनी अभ्यास केला नाही. ‘पाणी उशाला अन कोरड घशाला’, अशी धरणगावकरांची अवस्था झाली. त्यावर योग्य उपाय शोधलाच गेला नाही. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी निधीची कमतरता होती किवा आहे, असे म्हणता येणार नाही. केवळ चुकीचे नियोजन आणि अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनाचे बळी आमचे लोकप्रतिनिधी ठरले आहेत, एवढे मात्र खरे. त्यात विद्यमान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील समाविष्ट आहेत. त्यामुळे धरणगाव शहरवासीयांना नियमित पिण्याचे पाणी देणे हे पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे फार मोठे आव्हान होत होते आणि आहे. यामुळे धरणगाव शहरातील महिलांच्या एका स्नेह मेळाव्यात मार्गदर्शनपर आपले मत व्यक्त करताना, येत्या एप्रिल महिन्यापासून धरणगाव शहरात दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, ही खुशखबर दिली. उपस्थित महिलांनी पालकमंत्र्यांच्या या घोषणाचे उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यामुळे आता येत्या एप्रिल पासून दररोज पाणी देण्याची जबाबदारी पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्यावार आहे. विशेषतः स्वतःच्या मतदारसंघ म्हणून पाणी देणे बंधनकारक राहणार आहे.

२०२४ ला विधानसभेची निवडणूक आहे. दरम्यान शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना अशी आता मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी गुलाबरावांना कमालीचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यातच ‘सी वोटर्स’ ने केलेल्या सर्वेचा अहवाल धक्कादायक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा त्यांचा सर्वेचा अहवाल आहे. त्यातच महाविकास आघाडीची युती झाली तर गुलाबराव पाटलांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माजी मंत्री जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसून सज्ज झालेले आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गुलाबराव देवकर यांची लोकप्रियता चांगली आहे. गुलाबराव देवकर मंत्री असताना त्यांचे कालावधीत झालेल्या विकास कामांची नागरिक प्रशंसा करतात. त्यामुळे 2024 च्या होणाऱ्या निवडणुकीत गुलाबराव पाटील सुद्धा विरुद्ध गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) असा सामना रंगणार आहे. त्या दृष्टीने आतापासून गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीण मतदार संघात आपला संपर्क वाढवत आहेत. त्यामुळे धरणगावकरांना दररोज पिण्याचे पाणी निवडणुकीच्या आधी मिळालेच पाहिजे, अन्यथा धरणगावकरांना पाणी प्रश्न गुलाबराव पाटलांना बोंबावल्याशिवाय राहणार नाही. दररोज पाणी धरणगावकरांना मिळाल्यानंतरही धरणगाव शहरातील जातीच्या समीकरणाने आणि शिवसेनेच्या फुटीचा फायदा गुलाबराव देवकरांना मिळणार यात शंका नाही. एकंदरीत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दोन गुलाबरावंमधील होणारी निवडणूक लक्षवेधी ठरेल यात शंका नाही. यामुळे एप्रिल पासून धरणगावकरांना दररोज नित्यनेमाने पाणीपुरवठा करण्यासाठी धरणगाव शहरातील जलवाहिनी बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या निमित्ताने का होईना दळणगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न सुटून धरणगावकरांचा जणू वनवास संपणार आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here