भारत महासत्ता होणार कधी ?

0

लोकशाही, विशेष लेख

 

शीर्षकात विकसनशील नावाच्या पुढे प्रश्नचिन्ह दिसतंय.. ते प्रश्नचिन्ह फक्त विकसनशील शब्दावरच नाही तर देशाच्या विकासावर उभं राहतं. कारण, ‘खरंच भारत विकसनशील आहे’ ह्यावर विश्वास बसण्याजोग्या कोणत्या गोष्टी देशात होत आहेत? वरवर मोठ्या स्तरावर जरी दिसत असलं की, देशाचा विकास होतोय, पण जेव्हा तळागाळात जाऊन बघितलं जातं तेव्हा सत्यता काही वेगळीच आढळून येते. फक्त आपल्याला दिसत किंवा दाखवलं जातं तितकंच खरं नसतं, तर त्यामागे गंभीर सत्य असतं.. जे आपण स्वतः शोधायचं असतं आणि मग त्यानंतर लक्षात येत की, दाखवली जाणारी स्थिती पोकळ होती.. असंच काहीसं भारताच्या विकासाबाबत झालं आहे.

देशाचा विकास म्हणजे काय? ह्या व्याख्याच माहिती नसताना आपण खुशाल ‘विकसनशील देशात राहतोय’ असं अभिमानाने म्हणतो. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सामरिक, सांस्कृतिक ह्या सर्व बाबतीत जगाला आणि जागतिक राष्ट्रांना हेवा वाटावा आणि एक वेगळी छाप उमटावी अशी कामगिरी! तर खरंच ह्या दर्जापर्यंत आज भारत पोहचला आहे का? देशात बाकीच्या क्षेत्रातील स्थिती खालावत असताना सामरिक आणि आर्थिक विकास करून भारत विकसनशील होत नाही. कितीही टोचलं तरी हे सत्यच आहे. सामाजिक बाबतीत असणाऱ्या असमानता आपल्या समोर दिवसेंदिवस वाढत आहेत. सामाजिक विषमतांना वेठीस धरून मारामारी, खून, हल्ले रोज वाढतांना दिसताय. खऱ्या संस्कृतीला समजून न घेता निव्वळ देखावा आणि अंधश्रध्दा ह्याचा अवलंब होताना दिसतो आणि राजकीय क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर त्याची अगदी बिकट स्थिती आपल्यासमोर आज दिसतेय. आजही आपण पैसे देऊन मतदान करतो आणि हे सगळं घडत असताना आपण खरंच म्हणू शकतो का की भारत विकसनशील आहे?

भारताने जगाच्या पाठीवर एक वेगळी छाप उमटवली. कोरोना काळात इतर राष्ट्रांना वेळीच मदत करून वेगळा प्रभाव निर्माण झाला. पण हे जागतिक स्तरावरच ना! देश कोणताही असो तो तेव्हा विकसनशील होतो जेव्हा तेथील तळागाळातील जनता निदान विकासाच्या मार्गावर असेल. पण भारतात तसं दिसून येत नाही. आकडे दिसतात, टक्केवारी दिसते आणि त्यात वृध्दीही दिसते. पण त्या आकड्यांमागील परिस्थिती ही बिकटच असते. साक्षरता स्तर वाढताना ७४.०४ टक्के दिसतोय, पण प्रत्यक्ष काम करतांना लक्षात येत की फक्त शाळेत नाव दाखल केलं जातंय. ना मुल शाळेत जातात, ना शिक्षण घेतात.. मग त्यांचं साक्षर होणं दूरच!

आजही जागतिक गुणवत्तेनुसार पहिल्या शंभरातही भारतातील विद्यापीठे नाही. नेमका विकास, प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या शिक्षणाचा स्तरच मुळात भारतात खालावलेला आहे. फक्त पदवीचा कागद म्हणजे शिक्षण! ज्याचा रोजच्या आयुष्यात गंधही नसतो. असंच आपल्या देशात दिसून येत. त्यातून बेरोजगार पिढी निर्माण होताना दिसते. आज कृषिप्रधान म्हणवणाऱ्या भारतात डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी घडवले जातात, पण शेतकरी घडत नाही. आज जागतिक स्तरावर शेती उत्पन्नात तिसऱ्या स्थानावर असणारा भारत कृषिप्रधान राहील ना? आणि जेवढी शेती आहे तितकी सुद्धा कुठेतरी संपताना दिसतेय. लिंग भेदभाव संपून समानतेचा स्तर वाढतोय. पण तो ही आकडेवारीतच.. लिंग समानता अजूनही ८०% दिसून येतं नाही. आपण आर्थिक, सामरिक विकास करतोय म्हणजे विकसनशील होतो असं नाही. आजही आपण तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर भरवसा ठेवून उन्माद माजवतो, जेव्हा देशात खूप बिकट प्रश्न समोर असताना धर्म, जाती ह्याला केंद्रस्थानी ठेवून द्वेषाची भावना मजबूत करतो. तेव्हा ह्यात कुठेच देशाचा विकास दिसून येत नाही.

आज भारत ज्यांच्या हातात आहे, अगदी वरच्या स्तरापासून तर खालच्या स्तरापर्यंत त्यांना “भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत” ह्याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. राजकारणात लोक चांगले असले तर देश घडतो आणि चांगले नसले तर प्रगती खुंटते. तसचं काहीस भारताचं होतंय. मुख्य समस्यांवरून कानाडोळा करून फक्त आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भारतात आज जे काही प्रमाणाबाहेर घडतंय, ते भारताला प्रगतीच्या दिशेने नेत आहे, असं म्हणणं खरंच किती फोल ठरतंय! आज भारत महासत्ता बनू बघतोय, पण जे राष्ट्र महासत्ता आहेत त्यांच्या खरंच निदान बरोबरी करू इतके तरी आपण तोडीचे झाले आहोत का? संयुक्त राष्ट्र संघात भारताला आजही अस्थायी पद आहे. महासत्ता असणारे देश जेव्हा स्थायी सदस्यांमध्ये येतात तेव्हा मात्र भारताने निदान विकसनशील असण्याकडे तरी योग्य असेल याकडे लक्ष द्यावे, आणि सत्ताधाऱ्यांनी भारताच्या विकासाकडे!

देशात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टींना पाठिंबा देताना जनतेलाही लक्षात यायला हवं की, ह्या सगळ्या नंतर रस्त्यावर येतो तो फक्त सामान्य माणूसच! संबंधी राजकारणी किंवा अधिकारी नाही. आपलं आणि आपल्या देशाचं हित कशात आहे, हे जनतेलाही समजावं ही वेळ आता खरंच आली आहे. सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे, विकसनशील, विवेकनिष्ठ नागरिक आणि सत्ता असणं हे सध्या भारतासाठी गरजेचं आहे; ना की भोंगे, हिजाब, सभा आणि मोठमोठाले वक्तव्य!

शेवटी शिक्षित, साक्षर आणि माणुसकी जपणारी पिढीच प्रत्येक क्षेत्रात पुढे असेल तेव्हा भारताच्या प्रगतीच्या अपेक्षा उंचावतील. फक्त स्वार्थ साधला जाईल तोपर्यंत भारत आणि जनता फक्त नी फक्त अंधारातच आहे…!

चंचल संगीता सुनिल
जळगाव
८४५९२०१०९३

Leave A Reply

Your email address will not be published.