प्रेरणादायी शब्दांनी स्वतःची योग्यता सिद्ध करा

0

लोकशाही, विशेष लेख

 

शब्दांची ताकद हा मोठा विषय असला तरी एवढे मात्र निश्चित की, प्रत्येक शब्दाची आपली एक ताकद असते. हे शब्दच माणसाला प्रेरणा, दुःख, आनंद, आश्वासन (Assurance) देणारे असतात. प्रत्येक शब्द मानवाच्या अंतरंगात एक विशिष्ट अशी स्पंदने तयार करणारा असतो. ही स्पंदने मेंदूपर्यंत पोहचतात. त्याद्वारे निर्माण होणारी संवेदना ही ऊर्जा निर्माण करणारी असते. त्याच वेळी शब्द हे काळजालाही भिडतात म्हणून शब्द हे जपून वापरावे असे म्हणतात.

आश्वासक शब्द हे देखील याच प्रकारातील आहेत व ते देखील याच प्रकारात काम करतात. आपण आपल्याला म्हणजे आपल्या मनाला आश्वासन देणारे शब्द वापरल्यास आपल्याला एक सकारत्मक ऊर्जा मिळते. जी त्या प्रसंगात आपल्याला वाटचाल करण्यासाठी उपयोगी ठरते. ‘सर्व काही ठीक होईल, मी विजेता होणारच, आपणच जिंकणार’ ही आश्वासक वाक्ये आपल्याला प्रेरित करतात. बरेचसे लोक प्रेरणा देणाऱ्या वाक्याने प्रेरित होऊन अशक्य ही वाटणारे काम शक्य करून दाखविले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे आश्वासक आशीर्वचन सर्वच स्वामी भक्तांना प्रेरणा देणारे ठरले आहेत.

शब्दांच्या वापराने जर इतरांचे भले होत असेल, तर ते जरूर करावे यासाठीच आश्वासक शब्दांचा वापर दैनंदिन जीवनात करावे. आपली मोठी अशक्य वाटणारी कामे सहजरीतीने पार पडू शकतात. कोणीही व्यक्ती आपला सल्ला घेण्यासाठी किंवा मत विचारण्यासाठी आल्यास त्यास आपण आश्वासक शब्दांनी अलंकृत करावे. याचा फायदा इतरांपेक्षा आपल्यालाच अधिक होतो. आपली मनःशुद्धी होण्यासाठी किंवा मन निर्मळ होण्यासाठी म्हणून कायम दुसऱ्याला प्रेरणादायी शब्द वापरून आपणच आपली योग्यता सिद्ध करावी. जेणेकरून लोकांची दृष्टी निर्मळ होण्यासाठी मदतच होईल. काहींच्या बाबतीत त्यांची सकारत्मक विचारक्षमता अथवा दृष्टिकोन हाच त्यांना आश्वासक शब्द ठरतो. त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती ही स्वयंप्रेरित असते. त्यामुळे त्या कृतीतून सकारात्मक परिणाम नजरेत येतो. म्हणून स्वतःचे स्वतःशी असणारे सकारात्मक संभाषण हेच प्रेरक ठरते.

जी बाब व्यक्तिगत पातळीवर तीच सामूहिक पातळीवर देखील आढळते. कोर्पोरेट सेक्टरमध्ये टीम बिल्डिंग आणि टीम मॉनेटरिंग यामध्ये प्रत्येक समूहास एक घोषवाक्य दिले जाते, जे त्या समूहातील सर्वानाच प्रेरक ठरते. ‘हम होंगे कामयाब’ हे गीत आजही प्रेरकच ठरते. शब्दांची जादू किंवा किमया ही अशाच प्रकारे उपयोगात येते, जी प्रेरणा देणारी ठरते म्हणून कायम आश्वासकच राहावे व अशाच शब्दांचा वापर करावा.

प्रा. नितीन मटकरी, जळगाव
मो. ९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.