बापरे.. युट्यूबवर पाहून घरीच प्रसूती, नंतर बाळाला फेकले

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती (pregnant) असलेल्या एका अल्पवयीन मुलीने (Minor Girl)  चक्क यूट्युबवरील व्हिडिओ (YouTube video) बघून स्वतःची प्रसूती (delivery) स्वतःच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर मुलीने बाळाला तेथेच टाकून दिले. सुदैवाने हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने बाळाला रुग्णालयात हलवण्यात आले. या घडामोडीनंतर सदर मुलगी बेशुद्ध झाल्याने तिलाही रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  चार ते पाच महिन्यांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलगी व तिची आई घराजवळील खासगी दवाखान्यात गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्‍टरांनी मुलगी गर्भवती असल्याची शक्‍यता व्यक्त करून, सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यावेळी दोघींनीही त्याकडे दुर्लक्ष करीत गर्भाशयाला सूज आल्याने मुलीच्या पोटात दुखत असल्याचे जवळच्या लोकांना सांगितले. दरम्यान, रविवारी रात्री नवजात अर्भक सोसायटीच्या आवारात आढळून आल्याने सर्वांना धक्का बसला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

रात्री आठ वाजता संबंधित मुलगी बेशुद्ध झाली. त्यामुळे तिला रुग्णवाहिका बोलावून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हा सर्व प्रकार घरमालकिणीच्या लक्षात आल्याने तिने याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी उपचार घेत असलेल्या मुलीकडे विचारणा केली, तेव्हा आपणच यूट्युबवर व्हिडिओ पाहून स्वतःची प्रसूती केल्याची तसेच बाळाला सोसायटीच्या आवारात फेकून दिल्याची कबुली दिली. दरम्यान, याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जैतापूरकर यांनी सांगितले.

रविवारी रात्री प्रसूतीनंतर मुलीने बाळाला सोसायटीच्या आवारात टाकून दिले. दरम्यान, काही वेळातच तेथे एक मांजर आले, मांजर नेहमीपेक्षा वेगळ्या आवाजात ओरडू लागले, तर त्याचवेळी तेथे आलेल्या श्‍वानानेदेखील वेगळ्या आवाजात ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे स्थानिक नागरिक तेथे जमा झाले. त्यावेळी त्यांना तेथे नवजात अर्भक असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर, महिला पोलिस कर्मचारी शीला जाधव व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी बाळाला कपड्यांमध्ये गुंडाळून उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर म्हणाल्या की,  ही घटना अतिशय धक्कादायक असून, राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. सध्या बाळ व कुमारी माता उपचार घेत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.