“राष्ट्रपत्नी” संबोधल्यावरून संसदेत वाद-विवाद…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने संसदेत मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या निदर्शनादरम्यान राष्ट्रपतींसाठी हा शब्द वापरला होता. त्याला भाजपने आता हा प्रमुख मुद्दा बनवला आहे. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने यासाठी देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

संसदेत विरोधक व सत्ताधारी यांच्यातील कटुता अधिकच वाढली असून, दुरावा निर्माण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्मृती इराणी संसदेतही या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या होत्या. अधीर रंजन चौधरी यांनी सोनिया गांधी यांच्या परवानगीनेच असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी स्वतः देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी  म्हणाल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अधीर रंजन चौधरी यांनी ‘राष्ट्रपत्नी’ संबोधल्याने झालेला गोंधळ थांबत नाही आहे. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर सोनिया गांधी बाहेर येत असताना भाजप खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. स्मृती इराणी बोलल्या असता सोनिया गांधी भडकल्या. मला तुमच्याशी बोलायचे नाही, सोनिया गांधी इराणी यांना म्हणाल्या. प्रत्युत्तरात स्मृती इराणीही बोलल्या. यामुळे सुमारे दोन मिनिटे दोघांमध्ये वादावादी झाली.

आज लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी असभ्य आणि अपमानास्पद वर्तन केले. स्पीकर याचा निषेध करणार का? नियम फक्त विरोधकांसाठी आहेत का, असा प्रश्न काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावेळी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.