आपल्या पोटी स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दाम्पत्याचा दावा, गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी उत्साहात आणि भक्तिभावाने दत्त जयंती साजरी करण्यात आली. दत्त नामाच्या गजरात सर्व भाविक तल्लीन झाले होते. पण, कोल्हापूरमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. ‘आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आले, असा दावा करत एका दाम्पत्याने त्यांच्या अल्पवयीन मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. गडचिरोली येथील कसबा बावडा येथे घडलेल्या प्रकारची शहरात सगळीकडेच चर्चा सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादेअसे संबंधित संशयित दांपत्याचे नाव असून, शाहूपुरी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी त्या पालकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

बुवाबाजी करणाऱ्या दांपत्यावर कारवाई

इंद्रायणी आणि हितेश वलादे या दोघांनीही कसबा येथे ‘श्री बाल स्वामी समर्थ’ नावाने मुलाची ओळख बनवली होती. अगदी कमी वेळातच त्याचे हजारो भक्त झाले. त्यांनी दत्त जयंतीच्या निमित्तानेदेखील कसबा बावडा येथे भव्य पारायण करत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमालाही बरीच गर्दी झाली होती. मात्र या प्रकाराविरोधात अज्ञात व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. अशा अंधश्रद्धा पसरवणे, दहशत पसरवणे किंवा बुवाबाजी करणे यासाठी लहान मुलांचा असा वापर करणे हा जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काल संध्याकाळी वलादे दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.