डी मार्ट ते इच्छादेवी चौक रस्ता तात्काळ दुरुस्त करावा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या एक महिन्यापासुन डी मार्ट ते इच्छादेवी चौक या रस्त्याच्या दुर्दशेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा व महानगरतर्फे रस्ता रोखो आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिस प्रशासनातर्फे आम्हास आश्वासित करण्यात आले होते कि, संबंधितांशी सविस्तर बोलून रस्त्याचे काम करण्याबाबत निर्णय घेऊ. गेल्या १५ दिवसांपुर्वी महानगरपालिकेने रस्त्याचे कामाबाबत अंदाजपत्रक सादर करून निविदा प्रक्रियाही राबविण्याचे निश्चीत झाले होते. परंतु सदरील रस्त्याबाबत निर्णय होत नाही.

सदर रस्ता जळगांव शहर महानगर पालिकेने राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणतेय कि, काही बाबतीत पुर्तता व समाधान न झाल्याने आमच्याकडे वर्ग झाला नसल्याने म.न.पा. नेच त्या रस्त्याचे काम पूर्ण करावे व म.न.पा. निधीतुन काम करावे असे निश्चित केल्याचे कळते.

याअंतर्गत वादाने त्या रस्त्यावरील अतिक्रमण वाढून अपघातामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. याकरीता या रस्त्याबाबतची जबाबदारी निश्चित करून रस्त्याचे काम पुर्णत्वास आणून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा व नागरिकांना सुविधा द्याव्या. तसेच सर्व संबंधित विभागाची बैठक बोलवून राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकारी यांनाही सदर  बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी दिल्यास आमचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. असे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा व महानगरतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महानगर युवक अध्यक्ष रिंकू चौधरी, सहकार विभाग अध्यक्ष वाल्मिक पाटील, आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष इब्राहिम तडवी, शहर संघटक राजू मोरे, महानगर उपाध्यक्ष अनिल पवार, अशोक सोनवणे आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.