संतापजनक ! कर्जाच्या हप्त्यासाठी गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !

0

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क 

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने एका गर्भवती महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.  कर्जाचा हप्ता भरायला उशिर झाल्याने किरकोळ कारणावरून रिकव्हरी एजंटने हा संतापजनक प्रकार केला.  सदर घटना गुरुवारी इचक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

सदर मृत महिला ही एका दिव्यांग शेतकऱ्याची मुलगी असून ती तीन महिन्यांची गर्भवती होती. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज रतन चोथे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. रिकव्हरी एजंट वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. या वादानंतर एजंटने शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले. त्यात गर्भवती महिलेचा बळी गेला.

या घटनेमुळे इचक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी हजारीबाग शहरातील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मोठ्या संख्येने घेराव घातला. यावेळी आरोपीला वेळीच अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसेच मृत गर्भवतीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

या प्रकरणात रिकव्हरी एजंट आणि खाजगी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकासह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीचे अधिकारी तिला न सांगता तिच्या घरी आले. यावेळी गर्भवती महिला ट्रॅक्टरसमोर उभी होती. दरम्यान यावेळी वाद झाल्याने रिकव्हरी एजंटने थेट तिला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.