विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्याने शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल…

0

पुणे;- एकशिक्षकी शाळेतील शिक्षकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंडमध्ये घडली आहे. शाळेतील १० पैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने निराश होऊन या शिक्षकाने आत्महत्या केली असल्याचा खुलासा आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून झाला आहे.

अरविंद ज्ञानेश्वर देवकर वय 46 असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून, ते दोन महिन्यांपूर्वीच जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्तीतील प्राथमिक शाळेत बदलून आले होते.

अरविंद देवकर यांनी मागील गुरुवारी शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी तणनाशक अंगात मोठ्या प्रमाणात भिनल्याने त्यांच्यावर सुरुवातीला उरुळी कांचन येथे उपचार करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हडपसरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर पाच दिवसांनी हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

दरम्यान शिक्षकाने विद्यार्थ्यांसह शाळेत स्वच्छता करून घेतली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी ही बाब घरी सांगितली असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मुलांकडून शाळेची साफसफाई करून घेतली, ही बाब पालकांना खटकल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवले. दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी शाळा बदलली. हे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताच देवकर यांना नैराश्य आल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.