लोकशाही न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रियकराच्या बचावासाठी आरोपी पत्नीचा आक्राेश. साहेब, ‘जगदीश’ला माझ्या प्रियकराने नव्हे, तर मीच जीवे मारले. त्याला सोडा, मला शिक्षा द्या, असा जबाब आता मृतक जगदीशची पत्नी आरोपी दीपालीने पोलिसांसमोर दिला आहे. त्यामुळे ‘जगदीश’ हत्याकांडात दररोज नवनवे खुलासे पुढे येत असून, या घटनेने मात्र, आष्टीवासीयांची झोप उडाली हे तितकेच खरे.
नवीन आष्टी येथील गवंडी कामगार जगदीश देशमुख याला त्याची पत्नी दीपाली, प्रियकर शुभम, त्याचा मित्र विजय यांनी ठार केले. पोत्यामध्ये मृतदेह भरून एका शिक्षकाच्या घरासमोर नेऊन फेकला. त्यानंतर दीपाली घरी आली. तिचा प्रियकर शुभम व साथीदार विजय हे दोघेही एका दुचाकीने पहाटे ५ वाजताच्या सुमारास आर्वीला गेले.
एकीकडे सकाळ होताच पत्नी दीपाली पतीच्या शोधात हंबरडा फोडत होती. मात्र, तिचे कट कारस्थान अवघ्या काही तासांतच उघड झाले आणि पोलिसांनी दीपाली, प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय या तिघांना बेड्या ठोकल्या.
बहिण-भाऊ म्हणून राहायचे दोघेही एकत्र
मृतक जगदीशची पत्नी दीपाली आणि प्रियकर शुभम हे दोघे आर्वीत काही महिने राहिले. भाड्याच्या खोलीत ते बहीण-भाऊ असल्याचा बनाव करून शिक्षणासाठी राहात असल्याचे घरमालकाला सांगितले होते. मात्र, दोघांची अनैतिक वागणूक घर मालकास व परिसरातील लोकांना जाणवल्याने त्यांनी तातडीने रूम खाली करून मागितली. त्यानंतर दीपालीने आष्टीला येऊन जगदीशकडेच राहण्याचा निश्चय केला.
मृतकाच्या जीवलग मित्रानेच केला घात
मृतक जगदीश आणि आरोपी प्रियकर शुभम हे दोघेही जीवलग मित्र होते. मात्र, शुभमने जगदीशला मद्याच्या व्यसनात गुंतवून ठेवत त्याची पत्नी दीपालीशी जवळीक साधून प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि जगदीशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. शुभमने मदतीसाठी विजय माने याला सोबत घेतले.
आरोपी शुभम अन् विजय मामा-भाचे
आरोपी शुभम जाधव याच्यासोबत मिळून आरोपी दीपाली देशमुख यांनी जगदीशला संपविण्याचा कट रचला. मात्र, दोघाकडून हे काम अवघड असल्याचे समजताच त्यांनी विजय माने यालाही त्यांच्या कटात सहभागी करून जगदीशला कायमचे संपविले. आरोपी शुभम जाधव आणि आरोपी विजय माने हे नात्याने मामा-भाचे लागतात.