पारोळा : – काहीतरी विषारी द्रव्य प्राषण करून तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी राजेंद्र गजमल पाटील यांनी १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. चोरवड येथील शेतकरी राजेंद्र पाटील (वय ६०) यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे त्यांची सून आरती पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच दूरध्वनीवरून त्यांचे पती राहुल पाटील यांना कळवले. त्यानंतर राहुल पाटील यांनी तातडीने घरी येऊन त्यांना उपचारार्थ पारोळा येथील कुटीर रुग्णालय दाखल केले.
परंतु, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी राहुल पाटील यांच्या माहितीवरुन पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृत राजेंद्र पाटील यांच्यावर चोरवड सोसायटीचे जवळपास ६० हजार व हात उसनवारी चे ५० हजार कर्ज आहे. हे कर्ज कसे फेडायचे, याच विवंचनेत ते होते. तर यंदा अचानक बेमोसमी पावसाने उत्पन्नात घट आल्याने नैराश्यापोटी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे कुटुंबीयांनी सांगतिले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, ४ मुली, नातवंडे असा परिवार आहे.