चाळीसगाव नगरपालिका ॲक्शन मोडवर…

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी चाळीसगाव नगरपालिकेने ॲक्शन मोडवर येत धडक मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी पाणीपट्टी न भरल्याने एक फेब्रुवारीपासून 57 जणांची नळ जोडणी खंडित केली आहे. थकीत ग्राहक नगरपालिकेच्या रडार वर आले आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत ठोंबरे यांच्या निर्देशानुसार कर निरीक्षक राहुल साळुंखे यांच्या टीमने थकीत मालमत्ता व नळ जोडणी धारकांचे नळ कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम १ फेब्रुवारीपासून सुरू केली.

मोहिमेत कर निरीक्षक राहुल साळुंके यांच्या नेतृत्वात जितेंद्र जाधव, प्रवीण तोमर, कृष्णराव अहिरराव, कैलास नागणे, दीपक राजपूत, संजय देशमुख पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक गठीत केले आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरातील थकित नळ धारकांना वारंवार तोंडी लेखी सूचना देऊन सुद्धा बरेच मालमत्ताधारक यांनी थकीत रकमेचा भरणा केला नाही. परिणामी थकबाकीचा बोजा दिवसागणिक वाढत चालला आहे. जे नळ कनेक्शन धारक पालिकेच्या वतीने वारंवार नोटीस देऊन सुद्धा कर भरण्यास तयार नाहीत. अशांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे.

57 जणांची नळ जोडणी खंडित करण्यात आली असून थकबाकीदार गाळेधारकांचे गाळे सील करण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे मालमत्ता धारकांना कर भरण्यासंदर्भात सूचना देण्यात येत आहे. कर विभागाचे कर्मचारी शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन कर वसूल करीत आहे.शहरातील विकास कामे सुरळीत सुरू राहण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेची करवसुली आवश्यक असून थकीत रकमेचा लवकरात लवकर भरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.