माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या घरावर CBI चे छापे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह अनेकांच्या घरावर CBI ने छापेमारी सुरु केली आहे.

CBI ने संपूर्ण भारतात शोध मोहीम सुरु केली. एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि संजय पांडे यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती CBI ने सूत्रांनी दिली.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे संबंधित 16 ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू आहे. पांडे यांच्याविरोधात NSE कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने 3 एफआयआर दाखल केले आहेत. तर ईडीकडून 2 गुन्हे नोंदवले आहेत. तर सीबीआयकडून NSEचे माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येत आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार संपूर्ण भारतभर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. यापुर्वी संजय पांडे यांची मंगळवारी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. 2018 पासून सीबीआय NSE स्कॅमचा तपास करत आहे. 2009 ते 2017 या काळात शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संजय पांडे शिवसेनेत जाणार ?

संजय पांडे हे मविआच्या मर्जीतील असल्याचे बोलले जाते. गेल्या 30 जून रोजी ते सेवानिवृत्त झाले आहेत. संजय पांडे निवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना संजय पांडे यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांच्याविरोधात मैदानात उतरवू शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

संजय पांडे कोण ?

संजय पांडे यांनी आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण आयआयटी कानपूरमधून घेतले आहे. 1986 च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईमध्ये काम करताना त्यांनी 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण केले. त्यांच्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम, ड्रग्ज रॅकेटला आळा, अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करून भ्रष्टाचाराचा उलगडा केला होता. यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी ते हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला होता.

तर याशिवाय, 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेतही ते तैनात होते. संजय पांडे यांनी 2001 मध्ये राजीनामा दिला आणि परदेशात नोकरी करत होते. मात्र, राजीनामा मंजूर न झाल्याने ते पुन्हा सेवेत रुजू झाले. महाराष्ट्रातील चर्चित अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवले होते. यानंतर माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राज्य सरकारने त्यांची बदली केली आणि महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या संजय पांडे यांची या पदी नियुक्ती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.