गोळीबाराने नांदेड हादरले.. बांधकाम व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या

0

हाणमंतु देसाई, नांदेड़ लोकशाही न्यूज नेटवर्क

अल्पवधीत मराठवाडयात प्रसिद्धीस आलेले बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची हल्लेखोरांनी भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली. तर चालकावर ही गोळीबार करून जखमी केले. ही खळबळजनक घटना शहरातील शारदा नगर भागात मंगळवारी सकाळी घडली. नांदेड शहरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले असून शहर झाले बिहार. अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. दरम्यान सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर कैद झाले असून दोन ॲटोमॅटिक पिस्तूलमधून बियाणी यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे.

नांदेड शहरातील नावाजलेले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर अज्ञाताने दुचाकीवरून येऊन भरदिवसा गोळीबार केल्याची घटना सकाळी घडली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी १ वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नुकतेच त्यांना देण्यात आलेली सुरक्षा काढण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने नांदेड शहरात हल्लेखोरांची दहशत निर्माण झाली असून, हल्लेखोरांना अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे आहे.

नांदेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे सकाळी फिल्डवर्कवर जाऊन ११.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरी परतले होते. ते गाडीतून खाली उतरत घरात जात असतांना त्यांच्या पाठीमागून पाळत ठेऊन आलेल्या दुचाकीवरील अज्ञातांनी समोरून येऊन बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या मेंदूला लागून गेली, तसेच त्यांचा चालकही या गोळीबारात जखमी झाला आहे. हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आलेले असल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले जात आहेत.

गंभीर जखमी झालेल्या संजय बियानीसह चालकाला तातडीने खाजगी रुग्णालयात दखल केले. त्यांचेवर उपचार सुरु असताना संजय बियाणी यांची दुपारी १ वाजेच्या दरम्यान प्राणज्योत मालवली. संजय बियाणी यांचेवर कोणी गोळीबार केला..? कशासाठी केला..? याच कारण अद्यापतरी अस्पष्ट असले तरी बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर असून, त्यांच्यावर खंडणीच्या वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाला असावा..? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

मागील काळात काहींनी त्यांना खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच गुंडानी त्यांच्या कार्यालयात येऊन खंडणी मागितली, मात्र त्यांनी मोठ्या चतुराईने खंडणी मागणीसाठी आलेल्याना मी संजय बियाणी नव्हे असे सांगून ती वेळ टाळली. त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतू काही दिवसापूर्वीच त्यांचा सुरक्षक रक्षक काढण्यात आल्यानंतर आज गुंडानी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. एकूणच या घटनेमुळे नांदेड शहरातील आनंद नगर भागातील व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे.

हल्लेखोरांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, यात त्यां दोन अज्ञातांनी बियाणी यांचेसमोर येऊन गोळ्या झाडल्याचे दिसते आहे. त्यामुळे संजय बियाणी हे जमिनीवर पडले असल्याचे दिसत असून, हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले आहेत.

होतकरू व्यावसायिक गमावला: ना. चव्हाण

संजय बियाणींच्या रूपात नांदेडने एक सामाजिक संवेदना जपणारा तरूण, होतकरू व्यावसायिक गमावला आहे. शहरातील सर्वच भागात निवासी, व्यावसायी संकुल उभारून अनेकांच्या घराचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले, अशी भावना व्यक्त करून बियाणींच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्याचा सूचना ना. अशोकराव चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या घटनेनंतर त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी विस्तृत चर्चा करून आवश्यक ते निर्देश दिले.

नांदेडात गुंडाराज : खा. चिखलीकर

शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक तथा जीवलग मित्र संजय बियाणी यांच्या घरासमोर दिवसाढवळ्या गोळीबार करुन त्यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे वृत्त सकाळी दिल्लीत समजताच धक्का बसला. शहरातील कांही व्यापारी, डॉक्टर, राजकीय पुढाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याची माहिती पोलिसांकडे असतानाही बियाणी यांची निर्घृण हत्त्या म्हणजे बिहारलाही लाजवेल, असे हत्याकांड नांदेडला घडले. त्यावरुन नांदेडमध्ये गुंडाराज सुरू असल्याची प्रचिती या घटनेवरुन येते. यापूवीर्ही माझ्या मित्रमंडळातील काही जणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. नांदेडमध्ये सुरू असलेल्या गुंडाराजमुळे माझ्या जीवलग मित्राला गमावलो असल्याची प्रतिक्रिया भाजपा नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी खा. चिखलीकर यांनी केली.

नांदेडात तणाव; दुकानावर दगडफेक

भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने शहरात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावठी कट्टा, पिस्तूल अशी हत्यारे गुन्हेगारांना सहज मिळत आहेत. या घटनेपूर्वी ही शहरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांत दहशत पसरली आहे. शहरातील आनंदनगर भागात बियाणी समर्थकांनी बंद पाळत हत्येचा निषेध केला.काहींनी दुकानावर दगडफेक केली, त्यात एका दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या या घटनेनंतर नांदेडमध्ये तणाव निर्माण झाला असून एवढ्या मोठया घटनेमुळे पोलिसांच्या कार्यशैलीचे धिंडवडे निघाले आहेत.

तत्कालीन पोलीस अधीक्षक मगर यांची आठवण

तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड शहरात होणाऱ्या गोळीबारख्या घटनांवर चांगलीच जरब बसवली होती. रिँदासारख्या कुख्यात गुंडाने पळ काढला होता. केवळ एक वर्षाच्या कालावधीत अनेक नामवंत गुंडांना जेरबंद केले होते. पोलीस विभागातील गुंडांना साथ देणाऱ्या पोलीस निरीक्षकालाही मोक्का लावून अटक केली. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. आज घडलेल्या घटनेनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची पुन्हा एकदा नांदेडकरांना आठवण झाली.

सुरक्षा हटी दुर्घटना घटी

बांधकाम व्यवसायिक म्हणून संजय बियाणी नांदेडसह मराठवाड्यात प्रसिद्धीस आले होते. काही वर्षांपूर्वी बियाणी यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून कुप्रसिद्ध गुंड रिंधाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा अत्यंत चलाखीने बियाणी यांनी, आपण बियाणी नसल्याचे सांगून आपला जीव वाचविला. यानंतर बियाणी यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांची सुरक्षा काढण्यात आली आणि मंगळवारी सकाळी त्यांच्या घरासमोरच त्यांची हत्या झाली. यामुळे सुरक्षा हटी, दुर्घटना घटी अशी चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.