पाय घसरून पडल्याने १२ वर्षीय मुलाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

0

जळगाव;- एका १२ वर्षीय बालकाचा पाय घसरून गिरणा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १८ बुधवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास  तालुक्यातील आव्हाणे येथे उघडकीस आली असून याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैभव नरेंद्र पाटील (वय १२) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. वैभव हा इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी १७ रोजी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशीरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वैभवचा शोध घेतला. गावात व शेतीशिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा नातेवाईकांनी तालुका पोलीस स्टेशनला मिसींगची नोंद केली होती.

पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर बुधवारी देखील नातेवाईकांकडून वैभवचा शोध घेतला जात होता. गावातील काही जणांनी वैभवला दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले. याठिकाणी वैभवचे काका धीरज पाटील यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खेळताना वैभव नदीवर गेला असावा या शंकेने बुधवारी दुपारी २ वाजता धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह काही जण नदी पात्रात शोध घेत असताना, २.३० वाजता गिरणेच्या पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला. धीरज पाटील यांनी याबाबत त्वरित त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली.

१२ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांसह नातेवाईकांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तालुका पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यानंतर, मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वैभवला एक लहान भाऊ आहे. दरम्यान वैभवचे आई-वडिल नदीच्या बाजुला असलेल्या एका घरात एक महिन्यांपुर्वीच रहायला आले होते.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.