संतापजनक… संतती शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; आरोग्य सेवकास अटक

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

संतती नियमन शस्त्रक्रिया करण्याच्या मोबदल्यात 1 हजार रुपयाची लाच मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ​​​​​​लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकाने उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे ही लाच मागितल्याची घटना घडली आहे.

तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर बुधवारी नाशिक लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत आरोग्य सेवकाला लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदार यांच्या पत्नीची संतती नियमन शस्त्रक्रिया निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात करून दिल्याच्या मोबदल्यात निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक बळीराम दत्तात्रय शेंडगे‌‌ (45) यांनी तक्रारदाराकडे 1 हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने याची माहिती नाशिक लाचलुचपत विभागाला दिली होती. नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे व पथकाने सदर आरोग्य सेवकास 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या पथकात पोलिस निरीक्षक साधना बेळगावकर, पोलिस हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रफुल्ल माळी, विनोद पवार हे होते.‌ या संदर्भात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लासलगाव आरोग्य सेवकास एक हजार रुपयांचे घेतांना ताब्यात घेतले आहे. संततीच्या शस्त्रक्रियेसाठी महिलेची अडवणूक करून पैसे मागण्याचा आरोग्य सेवकाच्या प्रकाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत असून, या घटनेची जिल्हा आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

विशेष म्हणजे नाशिक विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने बुधवारी नांदगाव येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.