राणा दाम्पत्याला महापालिकेचा इशारा; ‘१५ दिवसांत इमारत पाडली नाहीतर…’

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणावरून निर्माण झालेल्या संघर्षामुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चांगलेच चर्चेत आले. दरम्यान राणा दाम्पत्याचे मुंबईतील खार येथील असलेल्या निवासस्थानाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत महापालिकेने नोटीस दिली आहे. तसेच १५ दिवसांच्या आत राणा दाम्पत्यानं बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

राणा दाम्पत्यांचा मुंबई येथील खार येथे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्या अपार्टमेंटचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं महापालिकेने सांगितलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला ७ दिवसांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटीसीची मुदत संपली असून महापालिकेने पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला इशारा केला आहे. कारणे दाखवा नोटीसीला राणा दाम्पत्यांनी उत्तरे दिली होती. ती उत्तरे पालिकेने अमान्य करत इशारा केला आहे. दरम्यान महापालिका बांधकाम अनाधिकृत असल्याच्या मुद्द्यावर ठाम आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांना शिवसैनिकांकडून विरोध करण्यात आला होता. राणा दाम्पत्यांवर वाद पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत नोटीस पाठवली होती.

दरम्यान त्या नोटीसीची मुदत संपल्यावर पुन्हा महापालिकेने इशारा केला आहे. पुढील १५ दिवसांच्या आत राणा दांपत्यानं बांधकाम पाडावे नाहीतर कारवाई करण्याचा पालिकेने इशारा केला आहे. यानंतर राणा दाम्पत्य काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.