मोठी बातमी! शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं

0

मुंबई :  राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने  शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. आता ठाकरे गट  किंवा शिंदे गटाला हे चिन्ह वापरता येणार नाही. अंधेरी पोटनिवडणूक आता धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षाचं नावदेखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यावे लागणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती.

ठाकरे गटाची प्रतिक्रिया : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. निशाणी कोणतीही असली तरी अंधेरीची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच लढेल आणि जिंकेल असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे गटाची प्रतिक्रिया : निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा तात्पूरता आहे की कायमचा आहे याबाबत तपासलं पाहिजे, काहीही असलं तरी आमचा दावा चिन्हावर आहेच असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. पण निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो मान्य करुन पुढे जावं लागेल, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचा ‘प्लान बी’ : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी कोणतं चिन्ह वापरायचं असा प्रश्न ठाकरे गटासमोर आहे. त्यामुळेच अंधेरी पोटनिवडणुकीसाठी वाघाचा चेहरा किंवा वाघ अशी निशाणी मिळवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. कारण शिवसेनेच्या बॅनरवर धनुष्य बाणासह नेहमीच वाघही झळकत आलाय. शिवसेनेचा वाघ जनतेला परिचित आहे. त्यामुळेच ठाकरेंनी वाघ चिन्हासाठी निवडणूक आयोगाला विचारणा केल्याचं समजतंय.

चिन्हाची करावी लागणार निवड : शिवसेनेचं चिन्ह गोठवल्याने दोनही गटाला 197 पैकी एका चिन्हाची निवड करावी लागणार असल्याची माहिती आहे.  यामध्ये ठाकरे गटाला हवं असलेले ढाल, तलवार किंवा वाघ अशा प्रकारचे कोणतंही चिन्ह नाही. त्यामुळं दोनही गट कोणत्या चिन्हाची निवड करतात हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.