बनावट दस्तावेज बनवणाऱ्या भुसावळच्या सेतू सुविधा चालकाविरोधात गुन्हा दाखल

0

भुसावळ : येथील सेतू सुविधा चालकाने बनावट नॉनक्रिमीलेअर दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस भरती प्रक्रियेत तरुणीची निवड झाल्यानंतर समोर आला आहे. याप्रकरणी सेतू सुविधा चालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात शासनाची फसवणूक केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या केंद्रातून अशा पद्धत्तीने अनेक बनावट दाखले देण्यात आल्याचा प्रांताधिकारी प्रशासनाला संशय आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास अनेक बाबी आता समोर येणार आहेत. उत्तम काशिराम इंगळे (रा. म्युन्सीपल पार्क, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, तालुक्यातील वेल्हाळे येथील पूजा संजय कोळी (वय २७) या तरुणीची मुंबई पोलिस दलात निवड झाल्यानंतर तिने सादर केलेले नॉनक्रिमीलेअर भुसावळ तहसीलदारांकडे पडताळणीसाठी आले होते. मात्र, नॉनक्रिमीलेअरवर असलेला बारकोड व २१ अंकी क्रमांक ऑनलाईन डेटाबेस तसेच महाआयटी सेलवर मॅच होत नसल्याने संशय बळावला.

प्रशासनाने याप्रकरणी तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी केली असता पूजा कोळी या तरुणीने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी उत्तम इंगळे यांच्या इंटरनेट ऑनलाईन सर्व्हिस या सेतू सुविधा कक्षातून ऑनलाईन नॉनक्रिमीलेअर मिळण्यासाठी अर्ज केला व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र, इंगळे याने बनावट अर्जाद्वारे तलाठी वेल्हाळे- जाडगाव यांचा १२ सप्टेंबर २०२३ रोजीचा पूजा कोळी यांचे वडील संजय पुंडलिक कोळी यांच्या नावाचा बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करून तो या प्रकरणासोबत जोडला. याप्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार प्रीती सदाशीव लुटे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून सेतू सुविधा चालक उत्तम काशीनाळ इंगळे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.