कांदापट्ट्यात भाजपची कसोटी

उत्तर महाराष्ट्रात चुरशीची लढत : शिक्षक देतोय लढत

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री विरुद्ध सामान्य शिक्षक ही लढत लक्षवेधी ठरत आहे. कागदावर लढत बहुरंगी दिसत असली, तरी महायुतीच्या डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे या दोघांतच खरा सामना होत आहे. राष्ट्रीय मुद्दे आणि विकासापेक्षाही कांदा व शेतीचे प्रश्न आणि आदिवासींची परवड हे स्थानिक मुद्दे वरचढ ठरू लागल्याने वातावरण तापले आहे. महायुतीच्या घटकपक्षांतील धुसफूस हासुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. शंभर टक्के कृषिपट्टा असलेल्या येथील लढतीचा निकाल सर्वांना चकित करणारा असू शकतो, अशी स्थिती आहे.

अनेक सर्व्हे, पाहणी केल्यानंतरही भाजपने दुसऱ्यांदा विश्वास दाखवत विद्यमान खासदार डॉ. पवार यांनाच मैदानात उतरवले, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सामान्य शिक्षक; पण हाडाचा कार्यकर्ता असलेले भास्कर भगरेंना पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करतानाच, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेली कामे, सोबतीला कोव्हिड काळात आरोग्यमंत्री म्हणून केलेले काम या जोरावर डॉ. पवार मतदारांना साकडे घालत आहेत, तर भगरेंनी मात्र कांदा आणि द्राक्षाच्या प्रश्नाला तडका देतानाच मोदी सरकारच्या काळात कृषी धोरणांचा उलट प्रवास सुरू असल्याचा आरोप करून ‘रान’ उठवले आहे. कुठे गेले, अच्छे दिन असा सवाल करीत स्थानिक आदिवासींच्या प्रश्नांना हात घातला आहे. शरद पवारांचे समर्थक श्रीराम शेटे, दत्तू पाटील, ठाकरे गटाचे जयंत दिंडे खेडोपाडी त्यांना साथ देत आहेत. 2014 मध्ये डॉ. भारती पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या प्रचाराची धुरा याच भगरेंनी वाहिली होती, हेही विशेष!

शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याने बारामतीनंतर राष्ट्रवादीसाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ अशी दिंडोरी ओळख असली, तरी पवारांना तो आजवर मिळू शकला नाही. भाजपने मात्र सलग चौथ्यांदा हा गड काबीज करण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. कांदा निर्यातबंदी उठविण्यासह भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची जंत्री डॉ. पवार मांडत असल्या, तरी मतदारांना ती पचनी पडत नसल्याचे चित्र जागोजागी दिसून येते. याउलट भगरेंना गावागावांतून मिळत असलेली आर्थिक मदत डॉ. पवार यांच्यासाठी नक्कीच चिंतेचा मुद्दा आहे. ‘माकप’चे जे. पी. गावित यांनी ‘हो-नाही’ करीत अखेरीस मैदानातून घेतलेली माघारसुद्धा निर्णायक ठरू शकते. त्याचवेळी भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अर्ज मागे घेऊन तलवार म्यान केल्याने भारती पवारांनी सुटेकचा नि:श्वास सोडला आहे.

दिंडोरी, येवला, निफाड आणि कळवण विधानसभा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे, तर नांदगाव शिंदे गट आणि चांदवड भाजपकडे असल्याने कागदावर महायुती ‘स्ट्राँग’ आहे. मात्र, असे असले तरी उरलेले चार-सहा दिवस तीनही गटांनी एकदिलाने काम केल्यास चुरस निर्माण होऊ शकते. मंत्री तथा येवल्यातील आमदार छगन भुजबळ आणि नांदगावमधून सुहास कांदे यांची मिळालेली साथ डॉ. पवारांना कुठवर मजल मारून देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर दोघांमधील कलगीतुराही महायुतीसाठी तापदायक ठरू शकते. पवार दाम्पत्याने उशिराने का होईना कळवणचे आमदार नितीन पवार, तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा राहिलेल्या भावजय जयश्री पवार यांची भेट घेतल्याने ए. टी. पवार कुटुंबीयांत दिलजमाई झाल्याचा संदेश गेला आहे. दिंडोरी आणि कळवणसह निफाड आणि नांदगावमधून मिळणारे मताधिक्य दोन्ही उमेदवारांचा निकाल फिरवू शकते. भगरेंच्या व्यासपीठावर अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी हजेरी लावल्याने एकूणातच दिंडोरीतील वातावरणाचा अंदाज यावा.

 

आदिवासींमध्ये दुफळीचा प्रयत्न

सुरुवातीच्या टप्प्यात कोळी-भिल्ल विरुद्ध कोंकणा अशी आदिवासी समाजाची दुफळी घडविण्याच्या झालेल्या प्रयत्नांना मतदारांनी आज तरी जुमानलेले दिसत नाहीत. तोडफोडीच्या राजकारणात माहीर असलेला भाजप अखेरच्या दोन-तीन दिवसांत कोणती जादूची कांडी फिरवणार, याची उत्सुकता आहे. वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्ष उमेदवारांना मतदार फार काही थारा देतील, असे चित्र नाही. ‘जरांगे फॅक्टर’ची आता चिंता करण्यासारखी परिस्थिती नसली, तरी मराठा समाजाचा पाठिंबा निकालात मोलाची भूमिका बजावू शकतो. अखेरच्या टप्प्यात साम-दंड-भेदनीती आणि त्या जोडीला प्रमुख नेत्यांच्या सभांनी ही निवडणूक रंगतदार आणि चुरशीची बनणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिंपळगाव बसवंत येथील सभेत कांद्याचा मुद्दा उपस्थित केल्याने शेतकरी त्यांच्यावर विश्वास दाखवतात, की ‘राम कृष्ण हरी…’ म्हणतात हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.