आ. किशोर पाटलांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे उपोषण मागे

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क              

वादळी पावसाने नुकसान नुकसान होऊन तीन वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आज तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उषोषणाला आमदार किशोर पाटील यांनी भेट देत एक महिन्याच्या आत शासनाकडुन भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

भडगाव तालुक्यात 11 जुन 2019 ला मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. त्यात 8-10 खेड्यातील 852 शेतकऱ्यांचे 567 हेक्टरवरील केळी व फळबागा उध्वस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यावेळी तत्कालीन  पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी ही याबाबात सातत्याने पत्रव्यवहार केला.

मात्र तीन वर्ष होत आले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. 26 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात या संदर्भात बैठक झाली. त्यांच्या सुचेनेनुसार सुधारीत प्रस्ताव ही पाठविण्यात आला आहे. मात्र त्यावर काहीएक हालचाल होतांना दिसत नाही. वादळात 10 -15 वर्ष जगवलेले फळबागा उध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भरपाई केव्हा मिळेल ? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून विचारला जात होता. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन देण्यात आले होते. भरपाई न मिळाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता.

आज तहसिल कार्यालयासमोर दिपक महाजन, सुधाकर पाटील (वडजी), विनोद बोरसे, सीमा पाटील (पिचर्डे), व्ही.एस.पाटील, भिमराव पाटील (घुसर्डी), प्रविण पाटील (शिवणी), उत्तम पाटील, सरपंच भास्कर पाटील, विनोद पाटील (बात्सर), स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी, समाधान पाटील (वडजी), विश्वास पाटील (निंभोर), कांतीलाल पाटील (कोठली), पी.डी.माळी (बोरनार), देविदास पाटील, विजय पाटील, सरपंच पप्पु पाटील (पाढंरद) आदि शेतकरी उपोषणाला बसले होते.

आमदारांचे आश्वासन अन् उपोषण मागे

आमदार किशोर पाटील यांनी दुपारी उपोषणाला भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत एक महिन्याच्या आत झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. उद्या मुख्यमंत्र्याची भेट घेऊन तेथे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्र्याना बोलावून तातडीने खास बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दोन वर्ष कोरोना त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे ही मदत लांबल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. मात्र आता एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊन न्याय देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तहसिलदार मुकेश हीवाळे, तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोर्डे हे उपस्थित होते.

उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठींबा 

दरम्यान शेतकऱ्यांना या उपोषणाला भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भेट घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातुन मदत देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय भाजपचे जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, शिवसेनेचे जे.के.पाटील (ठाकरे गट), पथराडचे सरपंच भाऊसाहेब पाटील, पत्रकार सागर महाजन, नरेंद्र पाटील, अशोक परदेशी, चर्मकार महासंघाचे पांडुरंग बावीस्कर याच्यांसह अनेकांनी भेट देत पाठींबा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.