भडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल धूम ठोकणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; पाच पैकी दोन आरोपी ताब्यात…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दि. १४ रोजी पहाटे ४ वाजता भडगाव पोलिसांच्या गोपनीय विभागाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील व स्वप्नील चव्हाण हे गस्तीवर असतांना त्यांना ठाणे अमलदारांनी एरंडोल कडून काही संशियत पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ या गाडीने भडगावच्या दिशेने येत असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी तात्काळ पेठ भागातील पिंपळगाव फाटा येथे सरकारी वाहनातील पोलीस नाईक एकनाथ पाटील, दत्तू पाटील यांना येण्यास सांगितले. दरम्यान ते तेथे पोहचले असता विलास पाटील, स्वप्नील चव्हाण यांनी एका ट्रॅक्टरला कासोद्या कडून येणाऱ्या रस्त्यावर आडवे लावण्यास सांगितले. तसेच त्यांच्या कडील जीपही आडवी लावली.

दरम्यान सकाळी ४:४५ वाजता एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने येताना दिसताच तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र स्कॉर्पिओ चालकाने गाडी न थांबविता सरळ आडवे लावलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पोलिस विलास पाटील यांच्या उजव्या मनगटाला मार लागला. मात्र पोलिसांनी तत्काळ स्कॉर्पिओतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. या धरपकड मोहिमेत आंधराचा फायदा घेत ३ चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी २ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या घडलेल्या सिनेस्टाईल थरारामुळे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.

या कारवाई नंतर पारोळा पोलिस स्टेशनचे पो.उप.निरीक्षक राजू जाधव, पोलिस कर्मचारी राहुल कोळी, एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक संदीप पाटील, सहायक फौजदार जगन्नाथ सोनवणे, कासोदा पोलिस स्टेशनचे इम्रान पठान, पोलिस कर्मचारी जितेश पाटील तेथे पोहोचले. यावेळी राजू जाधव यांनी सांगितले की विभागीय गस्त करून एरंडोल वरून पारोळा कडे जात असताना भालगाव शिवारात एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी संशयित रित्या येताना दिसली. तेव्हा आम्ही त्यांना थांबविण्यास सांगितले मात्र त्याने गाडी न थांबविता आम्हाला पाहून गाडी जोरात एरंडोल च्या दिशेने घेऊन पळून गेला. त्यामुळे राजू जाधव यांनी एरंडोल पोलिस व नियंत्रण कक्ष जळगाव यांना फोन करून तसे कळविले. स्कॉर्पिओ गाडी चालकाने गाडी एरंडोल शहरात न  नेता कासोद्याच्या दिशेने घेऊन गेला. तेव्हा तत्काळ नियंत्रण कक्ष यांनी नाकाबंदी लावण्याचे आदेश दिल्याने कासोदा पोलिसांनी भडगाव रोड वर नाकाबंदी लावली होती. तेव्हा स्कार्पीओ चालकाने तेथे न थांबता लावलेले  बॅरिगेट्स ला धडक देऊन तेथून भडगाव च्या दिशेनं जोरात निघाला. मात्र भडगाव पोलिसांनी वापरलेली शक्कल पुढे या चोरट्यांना नांग्या टाकाव्या लागल्या.

या कारवाईत संशयित आरोपी १) मुकेश विठ्ठल पाटील (२४) रा पाळधी ता धरणगाव. २)  रोशन मधुकर सोनवणे (३३) , अंबिका नगर वडजाई रोड धुळे. यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित आरोपींनी अन्य सहकार्यांचीही नावे सांगितले.

या दरम्यान आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक ३ लाख रुपये किंमतीची एम एच १८, डब्यू ०३७२ क्रमांकाची स्कॉर्पिओ. ५ हजार रुपये किंमतीचा १६ ए ओप्पो कंपनीचा मोबाईल, एक चाबिंचा जुडगा, एक दोरी बंडल, साडे तीन फूट लांबीचा गोलाकार रॉड, एक पॅनकार्ड, एकाचा वाहन परवाना, विटकरी रंगाचे पाकीट, असा एकूण ३ लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पाचही आरोपी विरूद्ध भडगाव पोलिसात ३९९, ३०७,  ३५३,३३२, ३२३, ४२७ प्रमाणे पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, भडगाव पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे. पकडलेल्या या दोन संशयितांना काल भडगाव न्यायलयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.