सौंदर्यात कला की, कलेत सौंदर्य?

0

लोकशाही विशेष लेख

सौंदर्याच्या (Beauty) फार निरनिराळ्या व्याख्या आपण बनवत असतो. आणि कितीही नाकारलं तरी माणूस त्या बाबतीत दिसण्यावर येऊन ठाकतो, हे नाकारता येणार नाहीच! मूलतः स्त्री पडद्यावरच्या, अभिनय क्षेत्रात काम करणारी ‘ती’ कशी दिसतेय, गोरी, काळी, बारीक, जाड, उंच, बारीक? यासोबतच एक महत्वाचा भाग असतो की तिचं शरीर भरीव आहे की नाही? इतके बोथट, सडके विचार बघून खरं तर दया येते.. तिच्यातील कलेपेक्षा तिच्या शारीरिक नैसर्गिकतेला महत्त्व देणारे स्वतःला रसिक म्हणून घेतात ह्याची कीव वाटते..

मेकअप मधली ‘ती’ यदाकदाचित आपल्यासमोर विना मेकअप आली, तर ती आपल्याला काळी, म्हातारी आणि तितकीच कुरूप वाटायला लागते. सोशल मीडियावरील मेकअप मधले तिचे फोटो चवीने लाईक, कमेंट, शेअर करणारे कुठून इतकी हिम्मत आणतात काय माहिती. नंतर हेच म्हणातात कशाला गरज मेकअपची? तुम्हीच सौंदर्याच्या व्याख्या पालटवल्या..

“आम्ही? की तुम्ही..?” “तुम्हीच…!” मेकअप मध्ये असणाऱ्या तिचे तुम्ही पंखे असणारे ती विना मेकअप असली तर तिच्या रंग, सुरकुत्या यामुळे तिला स्वीकारू शकत नाहीत, तर मग हे निव्वळ भेकड कौतुक कसलं?

पडद्यावरील ‘ती’ दिसायला तुमच्याभाषेत छान आहे, पण हावभाव प्रकार नाही तर ती पडद्यावर कुरुपच! जर फक्त रंगावरून कला ठरतं असेल तर मग स्मिता पाटील ह्याची ‘ती’ संघर्षांची वाट शोधणारी तीक्ष्ण नजर आता बोथट होत चाललीय! मग फक्त गोरे, बिकनी आणि लाखो फॉलॉवर्सची प्रसिध्दी म्हणजेच कला आहे काय?

कला इतकी बोथट नाही की ती रंग, प्रसिध्दीवर ठरेल. तिला बोथट आपण करतोय.. मग येतात ते, जे म्हणतात मुली सध्या लहान कपडे घालतात, मेकअप लय करतात आणि प्रसिध्दी मिळवतात. लय बघितलेत अशे. पण कशा काय प्रसिद्ध होता त्या? काय आकाशातून आणतात का प्रसिध्दी? नाही ना! आपणच गुलुगुलू करत त्यांना बघायचं आणि नंतर फक्त काहीतरी बोंभाट्या मारत बोंबलायचं.. म्हणून बोंबलत फिरावं इतकीच आपल्या नजरेत कला! अभिनयात हिरोईनच्या रंगापेक्षा तिच्या कलेचा दर्जा ओळखला जाईल ना तेव्हा सौंदर्य खर काय ते कळले!

जिथं कुठे रंग आणि शरीर बघून व्यक्तीला स्थान दिलं जातं किंवा नाकारलं जात असेल तर तिथं कला रुजत नसते. हा निव्वळ प्रसिद्धीचा खेळ असतो! आणि त्याला चारा पाणी घालणारे आपण नंतर डंका फुकतो की, अभिनय क्षेत्र बिघडत चाललय! स्वतःच्या दृष्टिकोनाचा स्वच्छ चष्मा घालण्याची गरज भासतेय हे नक्कीच! सौंदर्याची व्याख्या जर दिसण्यावर ठरतं असेल तर निव्वळ भेकडपणा! पडद्यावर असो वा खऱ्या आयुष्यात, नैसर्गिकता स्वीकारणे हेच सौंदर्य असतं आणि तिथं कला रुजते..
शेवटी काय तर “सौंदर्यात कला नाही तर, कलेत सौंदर्य असतं!” हेच खरं…!

चंचल संगीता सुनिल
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.