यंदा बैल पोळ्याच्या सणावर महागाईची झूल !

0

रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बैल पोळ्याचा सण एक दिवसावर येवून ठपल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांची बाजारात मोठी गर्दी दिसून आली. साजाच्या विविध साहित्याला महागाईचा फटका बसला असून, किंमतींमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी यंदा पोळा सणावरही  महागाईची झुल चढली असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसोबत मित्र, सखा म्हणून वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांचा पोळा हा सण उद्या शुक्रवारी  26 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.

वाढती महागाची झळ “सर्जा-राजा’च्या सणाला बसणार आहे. मात्र, वर्षातून त्यांचा सण एकदाच येत असल्याने साज शृंगाराच्या साहित्याच्या गगनाला भिडलेल्या किमती याची तमा बाळगता शेतकरी आपल्या लाडक्या बैलांचा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांसोबत शेतीच्या सर्वच कामांमध्ये साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण आहे. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी बैलांना पुरणपोळीचा पाहूणचार केला जातो. या सणाला शेतकऱ्यांमध्ये मोठे महत्त्व आहे. दि.  26 ऑगस्ट रोजी असलेल्या पोळ्यानिमित्त आदल्या दिवशी म्हणजे आज 25 सप्टेंबरला बैलांची खांदेमळण करण्यात येणार आहे.

पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना तलावावर किंवा विहिरीवर नेऊन स्वच्छ धुवून सजवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी गावाच्या पारावर किंवा खळ्यात घुंगरमाळा, म्होरक्या दोर, झूल, बाशींग, दोर असा साज-शृंगार बैलांना केला जातो अन् गावात त्यांची वाजत गाजत आपल्या गावाच्या प्रवेश द्वाराजवळ दरवाजाजवळ येऊन पोळा फोडण्याच्या ठरवलेल्या वेळेनुसार गावातील प्रतिष्ठित, नागरिक, पुढारी, शेतकरी एकत्र येऊन पूजा करून वाजत गाजत पोळा फोडला जातो.

सगळेच शेतकरी बैल मिरवत घराच्या दिशेने नेतात. घरी आल्यावर सगळं शेतकरी कुटुंब एकत्र येऊन त्यांचे पाय धूत त्यांची पूजा करतात. त्याला नतमस्तक होत गोडधोड पुरणपोळी, धान्य खाऊ घालतात. अन्  गावभर त्यांची मिरवणूक काढतात.

Leave A Reply

Your email address will not be published.