बहिणाबाईंच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Maharashtra State Minister for Higher and Technical Education Uday Samant) हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ जळगाव’ या कार्यक्रमासाठी उदय सामंत शनिवारी विद्यापीठात उपस्थित होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन, प्रधान सचिव टिकाचंद रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसंचालक धनराज माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University) बहिणाबाई चौधरी यांच्या अध्यासन केंद्रासाठी (Bahinabai Chaudhari adhyasan kendra) राज्य शासनाकडून (State government) 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी याबाबतची घोषणा शनिवारी जळगावात केली.

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे यापुढे आता कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असलेला माणूस प्राचार्यच राहील, याची ग्वाही मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून देत असल्याचेही सामंत यांनी जाहीर केले. पण प्राचार्य म्हणून त्या व्यक्तीने त्या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून ते महाविद्यालय क्रमांक एकचे महाविद्यालय राहील, अशा पद्धतीने कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

9 तरुणांना अनुकंप तत्वावर नोकरीचे नियुक्तपत्र

कार्यक्रम प्रसंगी मंत्री उदय सामंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 9 तरुणांना अनुकंप तत्वावर तात्काळ नोकरीचे नियुक्तपत्र देण्यात आले. आजपर्यंत या तरुणांना अनुकंपा तत्वावर नोकरीपासून वंचित राहावे लागले; यामागे कदाचित यंत्रणेची चूक असेल. पण ही चूक आज सुधारली गेली असेही त्यांनी सांगितले. तसेच उदय सामंत यांनी आपल्या भाषणात विद्यापीठ प्रशासनाला काही सूचना देखील केल्या. विद्यापीठ आणि शासनाने एकत्र काम करायला हवे, यंत्रणेसोबत समन्वय असावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्यपालांना मानसन्मान देणे आपले कर्तव्यच

मंत्री उदय सामंत यांनी भाषणादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामाचे कौतुक केले. आज जळगाव विद्यापीठात प्रभारी कुलगुरू आहेत. विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळावेत म्हणून आपण राज्यपालांकडे मागणी आग्रहाने मांडावी. त्यांच्याकडून माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे न्याय मिळू शकतो. त्यांच्याकडे घटनात्मक पद असल्याने त्यांना मानसन्मान देणे आपले कर्तव्यच असल्याचेही सामंत म्हणाले.

बहिणाबाईंच्या पुतळ्यासाठी 1 कोटींचा निधी
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली. बहिणाबाईंचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात लवकरच उभारण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या दरम्यानच महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने अॅड. सुनील देवरे यांनी मंत्री उदय सामंत यांना उभं राहून प्रश्न विचारला. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका कधी सुरू करण्यात येतील? या संदर्भात राज्य शासनाने काय भूमिका घेतली आहे? याबाबत त्यांनी प्रश्न विचारत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी सांगितले की, या संदर्भात कार्यक्रमानंतर बोलूया. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि अडीअडचणी समजून घेण्यासाठीच मी या ठिकाणी आल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू देण्याच्या मागणीसह इतर 32 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.