सामाजिक सलोखा राखण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी

0

सामाजिक न्यायाच्या विविध विषय समित्यांचा आढावा

जळगाव;- सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्यात येते. वंचित घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर सामाजिक सलोखा टिकून राहातो. सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व शासकीय विभागानी क्षेत्रीय स्तरावर समन्वयाने काम करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

महाबळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण विभागाच्या विविध विषय समित्यांच्या जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस.लोखंडे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे विविध विभागातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाशी संबंधित असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जिल्हा दक्षता समिती, रमाई घरकुल योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, शासकीय वसतिगृह निरीक्षण समिती, ज्येष्ठ नागरिक संनियंत्रण समिती, प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजना व डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या विषय समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या.

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. पोलीस प्रशासनाने ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात पोलीस तपासावरील गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून चार्जसीट दाखल करण्याची जलद कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने अमळनेर शासकीय वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करुन ऑक्टोबर २०२३ पर्यंत ताब्यात देऊन नोव्हेंबर २०२३ पर्यंत उदघाटन होईल. यादृष्टीने तयारी करावी.

जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रशासन यांनी रमाई आवास योजनेचे नागरी क्षेत्रातील प्रस्ताव दोन दिवसात सादर करावेत. पंचायत समिती प्रशासनाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचे त्रुटी असलेल्या प्रस्तावांची त्रुटी पूर्तता लवकरात लवकर करावी. महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक संनियंत्रण समितीसोबत ज्येठ नागरिक विरंगुळा केंद्र निर्मिती बाबत स्वतंत्र बैठक घ्यावी. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्ष सुरू करावा. समाज कल्याण विभागाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील प्राप्त जमीन नवीन लाभार्थ्यांना वितरित करण्याची कार्यवाही करावी. अशा सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी विविध विभागाना केल्या.

प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजनेचे प्राप्त प्रस्ताव व कामाचा अर्थसंकल्प चार दिवसात सादर करणेबाबत जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी यावेळी सूचना केल्या.

या बैठकीस पोलीस, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग, पाचोरा व एरंडोलचे उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, ज्येष्ठ नागरिक समितीचे अशासकीय सदस्य तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आढावा बैठकीपूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी केली. बैठकीच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक भेट उपक्रमास सुरूवात

जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय बैठका, कार्यक्रमात स्वागतासाठी हारतुरे, पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट म्हणून देण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत‌. या निर्देशानंतर समाजकल्याण विभागाची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अण्णाभाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी भेट म्हणून दिली. त्यामुळे जिल्ह्यातील या उपक्रमास सुरूवात झाली. भेट म्हणून मिळालेले पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा ग्रंथालयाकडे सुपूर्द केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.