संपूर्ण विश्वाच्या आरोग्यासाठी आयुर्वेद

0

आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस

आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने श्री धन्वंतरी जयंतीच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा केला जातो. 2016 सालापासून हा आयुर्वेद दिवस संपूर्ण भारतात साजरा करतात. देवदानव  युद्धाच्या वेळी समुद्रमंथनातून भगवान श्री धन्वंतरी हातात अमृतकलश, शंख, चक्र व जळवा घेऊन बाहेर आले ते जगत कल्याणासाठी संपूर्ण विश्वाच्या आरोग्यासाठी म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेद दिवस साजरा केला जातो.

यावर्षीची आयुर्वेद दिवसाची थीम आहे एक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद. G 20 परिषदेतील ‘वसुधैव कुटुंबकम’ या थीमला अनुसरून संपूर्ण विश्वातील मानव, पशू पक्षी प्राणी वनस्पती या सगळ्यांच्या आरोग्यासाठी एक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद ही थीम आहे. यावर्षीचा आयुर्वेदिक दिवस हा खूप खास आहे कारण जगभरात शंभर देशांमध्ये आयुर्वेदिक दिवस साजरा केला जाणार आहे.  यावर्षीचा हा आठवा आयुर्वेद दिवस आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की हळूहळू संपूर्ण जगात आयुर्वेदाला मान्यता मिळत आहे. आयुर्वेद हे आपले प्राचीन वैद्य शास्त्र असून पाच हजार वर्षांची परंपरा आयुर्वेदाला लाभली आहे. आयुर्वेद हे शाश्वत आणि सिद्ध शास्त्र असून त्यात लिहिलेले सिद्धांत आजही जसेच्या तसे लागू पडताना दिसतात .आज जर तुम्ही पाहिले की आरोग्याच्या बाबतीत बरेच नवीन नियम येतात, सिद्धांत येतात आणि काही वर्षांनी ते मागे पडतात किंवा ते योग्य प्रकारे लागू होत नाही असे दिसते मग त्या जागी नवीन नियम किंवा सिद्धांत येतात परंतु आयुर्वेदाच्या बाबतीत असे नाहीये आयुर्वेदाचा मूळ उद्देश आहे.

 

स्वस्थस्य  स्वास्थ्य रक्षणम|

आतुरस्य व्याधी प्रशमनम||

 

म्हणजेच स्वस्त व्यक्तीच्या स्वास्थ्याचे अधिक रक्षण करावे त्यासाठी आयुर्वेदात दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या इत्यादी सांगितले आहे. प्रकृतीचा विचार आहे प्रकृतीनुसार आहार विहार सांगितला आहे, त्यानुसार प्रत्येकाने सर्व गोष्टीचे पालन केले तर व्याधीक्षमत्व उत्तम राहते आणि शरीर स्वास्थ्य टिकून राहते आणि हे सगळे करूनही जर कोणी आजारी पडले तर त्यासाठी औषधोपचार पंचकर्म इत्यादी उपाय आहेतच. पंचकर्म म्हणजे संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण जसे आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तसेच आपल्या शरीराचे सर्व्हिसिंग म्हणजेच पंचकर्म.

कोरोना सारख्या साथीच्या आजारातही आयुर्वेद औषधांचा व आयुर्वेदोक्त आहार विहार इत्यादीचा उपयोग सगळ्यांनी पाहिला आहे आणि अनुभवलाही आहे.

आयुर्वेद हे शास्त्र आरोग्याचा सर्वांगीण विचार करते फक्त शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक व आत्मिक समाधानाचाही विचार यात केलेला आहे.

 

समदोष:  समाग्नीश्च् समधातू मलक्रिया:|

 प्रसन्न आत्मेंद्रीय मना: स्वस्थ इतिअभिधियते||

 

आयुर्वेदानुसार स्वस्त व्यक्तीची ही व्याख्या आहे ज्याचे सर्व दोष (वात पित्त कफ ), अग्नी (जाठराग्नी), धातू (रसरक्तादी सात धातू ), मल (मूत्र पुरीष स्वेद) इ. हे समज स्थितीत असून सम म्हणजे ना कमी ना जास्त ज्याचे मन इंद्रिय व आत्मा हे प्रसन्न आहेत ती व्यक्ती स्वस्त आहे एवढा व्यापक विचार आयुर्वेदात आहे.  सध्या सगळीकडेच विविध आजार जसे हृदयाचे विकार, ब्लड प्रेशर, दमा,  हार्मोनल असंतुलन, लिव्हर किडनी पोटाचे आजार, कॅन्सर इत्यादी खूप जास्त प्रमाणात वाढलेले दिसत आहेत.  प्रत्येक घरात यापैकी काही ना काही आहेत याचे कारण बदललेली जीवनशैली, आहार विहार, भेसळयुक्त खाद्यपदार्थ, जंतुनाशकांचा अतिवापर बदललेले पर्यावरण, संकरीत बियाणाचा वापर, प्राणी पक्ष्यांना देण्यात येणारे इंजेक्शन्स्, नाईट लाईफ, कामाचा,  रिलेशनशिपचा वाढलेला ताण, चिंता, व्यायामाचा अभाव किंवा अतिरेक, डाएटचे फॅड इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्यावर वाईट परिणाम झालेले आहेत.

लहान मुलांच्या आरोग्य समस्या ही खूप वाढलेल्या आहेत या सर्वांवर आयुर्वेदात उत्तम उपाय सांगितलेले आहेत.  जिथे इतर उपचार कमी पडतात तिथे आयुर्वेद उत्तम काम करताना दिसते आयुर्वेदात फक्त मनुष्य प्राण्याकरिताच नाही तर शेती इतर प्राणी वृक्ष इत्यादी सगळ्यांमध्ये आयुर्वेदाचा वापर करता येतो.  आयुर्वेद आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला शिकवतो.  निसर्ग जपायला शिकवतो आपले सणवार हे सुद्धा ऋतू नुसार होणारे बदल लक्षात घेऊन त्यायोगे शरीर स्वास्थ्याचा विचार करूनच ठरवलेले आहेत असे दिसते.  आता शरद ऋतू संपून हेमंत ऋतूची सुरुवात आणि दिवाळीचा सण येतो.  वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज असा हा सहा दिवसांचा सगळ्यात मोठा सण या सणांमध्ये आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने ही सर्व उपाय सांगितलेले दिसतात.

अभ्यंग स्नानाचे महत्त्व दिवाळीला खूप जास्त आहे. कारण हेमंत ऋतूपासून सुरू होणाऱ्या हिवाळ्यात त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी अभ्यंग अत्यंत गरजेचे आहे.  तसेच तेल अभ्यंगामुळे संपूर्ण शरीर स्वास्थ्यही उत्तम राहते आणि उटणं लावून छान अंघोळ केली की चित्तवृत्ती प्रसन्न होतात. तसेच दिवाळीत केले जाणारे फराळाचे पदार्थ गोडाधोडाचे पदार्थ हे शरीराला ताकद व सिद्धता देतात अर्थातच जपूनच खावे या पद्धतीने आयुर्वेद दृष्ट्या जर हा सण साजरा केला तर त्यामुळे आपले आरोग्य टिकून राहते.

चला तर मग सर्वांनी मिळून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करून आयुर्वेदाचा दैनंदिन जीवनात वापर करून घरोघरी आयुर्वेद हा संदेश सगळीकडे पसरवू आणि आपले आणि समाजाचे संपूर्ण विश्वाचे आरोग्य निरोगी ठेवूया.

 

डॉ.  लीना बोरुडे, पुणे 

आयुर्वेदाचार्य

9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.