व्याधीक्षमत्व व आयुर्वेद

0

लोकशाही विशेष लेख

आपली रोगप्रतिकारशक्ती व्याधीक्षमत्व किंवा रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच ‘इम्युनिटी’ हा शब्द गेल्या दोन वर्षांपासून आपल्या सगळ्यांनाच खूप परिचित झाला आहे. पण रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय, ती कशी व कुठून मिळते, कशी टिकते व कशी वाढवता येते याची नीट माहिती कोणालाच नाही. सोशल मीडियावर व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी अनेक मेसेजेस असतात पण त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. बऱ्याचदा अपायच होताना दिसतात.

आज प्रत्येक घरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, हार्मोनल असंतुलन, किडनीचे आजार, पचनाचे आजार, मानसिक विकार असे अनेक प्रकारचे आजार दिसून येतात. तसेच ऋतू बदल झाल्यावर, जिवाणू, विषाणू संसर्ग इत्यादीमुळे अनेक लोक आजारी पडताना दिसतात. मात्र काही लोकांना सहसा काही त्रास होताना दिसत नाही. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.

सगळ्यात आधी आपण स्वस्थ निरोगी व्यक्ती कोण असते ते पाहूया.
ज्या व्यक्तीचे वात पित्त कफ हे दोष, रस, रक्तादी धातू, मल व अग्नी हे सम स्थितीत आहेत. तसेच ज्याचे आत्मा, मन व इंद्रिय प्रसन्न आहेत तो स्वस्थ आहे. म्हणजेच यातील एक जरी गोष्ट बिघडली तर आजारी होणार. आता आपण आयुर्वेदानुसार व्याधीक्षमत्व समजून घेऊ.

व्याधीक्षमत्व म्हणजे रोगाला दूर ठेवण्याची शक्ती ही दोन प्रकारची असते एक म्हणजे व्याधी उत्पन्नच न होऊ देणे व्याधीउत्पादप्रतिबंध आणि दुसरी म्हणजे आजार झालाच तर तो लवकर आटोक्यात आणणे व्याधीबलविरोधी तसेच त्याचे आणखी 3 प्रकार आहेत.

१.सहज : म्हणजेच जन्मतः आईवडीलांकडून मिळालेली

2.कालज : वय व ऋतूनुसार हेमंत व शिशिर ऋतूत इम्युनिटी उत्तम, वसंत व ग्रीष्म ऋतूत मध्यम तर वर्षा व शरद ऋतूत कमी असते. तसेच बाल वयात मध्यम, तरूण वयात उत्तम व वृद्धावस्थेत कमी असते.

3.युक्तिकृत : योग्य आहार विहार औषधे यांनी प्राप्त केलेली.

जन्मतः आई-वडिलांकडून आपल्याला रोगप्रतिकार शक्ती मिळतच असते पण ती टिकवणे वाढवणे हे आपल्या हातात असते आणि त्यासाठी रोज सातत्याने प्रयत्न करावे लागतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक त्रास व आजार होताना दिसतात त्याचमुळे रोगप्रतिकार शक्ती ही कमी होते. चुकीचा आहार विहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप ,बाहेरचे खाणे, सततचे बैठे काम,मानसिक ताण अशी अनेक कारणे आहेत.

आयुर्वेदाचा मूळ उद्देश हा स्वस्थ्य. ‘स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्रशमनम् च||” हा आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे आधी रक्षण करायचंय. त्यासाठी आयुर्वेदात खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसे ‘स्वस्थ वृत्तपालन’ यात दिनचर्या म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्या कशी असावी हे सांगितलेले आहे.

ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूत जसे वसंत ग्रीष्म वर्षा इत्यादी ऋतूत आपला आहार, विहार कसा असावा, याचे वर्णन केलेले आहे. त्यानुसार पालन केल्यास आरोग्य उत्तम राखले जाते आणि व्याधीक्षमत्व टिकून राहते. हे सगळे व्यवस्थित पालन करूनही जर कोणी आजारी पडलेच तर औषधोपचार करणे. यात ही पथ्यापथ्य, योग्य, आहार, विहार, व्यायाम याला खूप महत्त्व आहे.

एक दिवस चांगला आहार घेतला, खूप व्यायाम केला, चांगली झोप घेतली किंवा एखादी गोळी, काढा घेतला म्हणजे आपले व्याधीक्षमत्व वाढेल आणि ते टिकून राहील, असं नसतं तर यासाठी रोज प्रयत्न करावे लागतात.

आहार रोजचे जेवण हे षड्रसयुक्त म्हणजेच गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट व कडू चवींचा समावेश असलेले असावे. घरचे ताजे व गरम जेवण करावे. भूक लागल्यावरच जेवावे. सिझनल व आपल्या भागात पिकणारे धान्य, फळे, भाज्या यांचा समावेश रोजच्या आहारात असावा. बाहेरचे,तळलेले, आंबवलेले, बेकरीचे पदार्थ,फास्ट फुड, कोल्ड्रिंक टाळावेत. काळे मनुके, खजूर, बदाम, सुके अंजीर तसेच डाळिंब, सफरचंद, पेअर संत्री, मोसंबी, चिकू, केळी इ. फळांचा वापर करावा.

रात्रीचे जेवण लवकर करावे. रात्री उशीरा जेवल्यानंतर पचन बिघडते. रात्रीचे जेवण व झोप यात किमान २ ते ३ तासांचे अंतर हवे. जेवणानंतर १५ मिनिट चालावे व वज्रासनात बसावे. रोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे. रात्री जागरण करू नये लवकर झोपावे व सकाळी लवकर ब्राह्म मुहूर्त वर म्हणजे पहाटे ४ वाजता किंवा निदान ६ वाजता तरी उठावे. दुपारी जेवणानंतर झोपू नये. आठवड्यातून किमान एकदा तरी अंगाला तेल लावून अभ्यंग करावे. त्यामुळे वात दोष संतुलित होतो. रोज पोट नीट साफ होईल असे पहावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली पचनशक्ती नेहमी चांगली राहिली पाहिजे. कारण जर जाठराग्नी म्हणजेच पचन शक्ती कमी झाली तर आपल्याला विविध आजार होऊ शकतात.

शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य ही खूप महत्त्वाचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण तणाव कमी करून उत्तम आरोग्यासाठी योगासन, सूर्य नमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा यांचा उत्तम उपयोग होतो. कारण शरीर व मन हे दोन्हीही स्वस्थ असतील तरच उत्तम निरोगी आयुष्य जगता येते. सद्वृत्तपालन, आचार रसायन याने वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक आरोग्य चांगले राहील.

आयुर्वेदातील पंचकर्म उपचाराने शरीरशुद्धी आपल्या प्रकृतीनुसार, आजारानुसार व ऋतूनुसार वैद्यांच्या सल्ल्याने करून घेतल्यास व्याधीक्षमत्व टिकवण्यास मदत होते. हळद, गुळवेल, आवळा, तुळस, अश्वगंधा, शतावरी, कोरफड ह्या काही वनस्पतींचा वापर इम्यूनिटी वाढवण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याने करावा. स्वतःच्याच मनाने, सोशल मीडियावरिल मेसेज वाचून आपल्या आरोग्यावर प्रयोग करू नये.

आज सर्वत्र विविध विषाणू जिवाणूमुळे होणाऱ्या आजारांची भीती पसरली आहे. अशावेळी ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना कोणताही त्रास होताना दिसत नाही. म्हणूनच सगळ्यांनी आयुर्वेद व योग यांच्या मदतीने आपले स्वास्थ्य आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.

डॉ. लीना बोरूडे
आयुर्वेदाचार्य पंचकर्म व वैद्यक योग तज्ञ
फोन. 9511805298
ईमेल [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.