आयुर्वेदाचा संक्षिप्त इतिहास

0

लोकशाही विशेष लेख

 

आयुर्वेद (Ayurveda) म्हणजे दीर्घायुष्यासंबंधी विचार करणारा वेद होय. आयुर्वेदाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल.

“तत्र आयुर्वेद्युती त्यायुर्वेद द्रव्य गुण कर्मानी वेद्यतोप्यायुर्वेद”

जो आयुष्याचे ज्ञान करवितो तो आयुर्वेद होय. तसेच जो आयुष्याला हितप्रद व हानिकारक अशी द्रव्य – गुण – कर्मे समजावून सांगतो तो आयुर्वेद होय. (संदर्भ चरक संहिता सूत्रस्थान ३०.३३)

जीवनाच्या विकासाच्या दृष्टीने या शास्त्राची उभारणी झालेली आहे. केवळ रोगोपचार सांगणे हा या शास्त्राचा उद्देश नाही. तर रोगोच्छदाबरोबरच स्वास्थानुवृत्ती कशी राहील याची चर्चा आयुर्वेदात केलेली आहे. याला अथर्ववेदाचा (Atharvaveda) उपवेद मानतात. काय, शल्य, शल्य, शालाक्ये, बाल, ग्रह, विष, रसायन व वांजीकरण अशी आयुर्वेदाची आठ अंगे आहेत. आयुर्वेदाच्या सर्व संहिता व संग्रहग्रंथ यात ब्रह्मदेवांना आयुर्वेदाचे आदीप्रवक्ता असे म्हटले आहे.

स्वयंभू ब्रह्मा प्रजा: सिसूक्षू: प्रजाना
परिपालेनार्थमायुर्वेद मवा ग्रेड सृजत्..!

अर्थ – प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणाऱ्या स्वयंभू ब्रह्मदेवांनी प्रजेच्या परिपालनासाठी प्रथम आयुर्वेद शास्त्राची निर्मिती केली. साक्षात ब्रह्मदेवांनी आयुर्वेदाची सुमारे एक लाख श्लोक असलेली एक संहिता लिहिली तिचे नाव ब्रह्म संहिता होते. ही संहिता आज उपलब्ध नाही परंतु त्यांनी उपदेश केलेले सोळाहून अधिक योग आज सुद्धा आयुर्वेद ग्रंथात सापडतात. चंद्रप्रभावरी ब्राह्मी तेल व ब्राह्म रसायन हे त्यापैकी तीन आहेत. साक्षात ब्रह्मदेवांनी आपली ही विद्या दक्ष प्रजापती व भास्कर यांना प्रदान केली. दक्षांच्या आयुर्वेद विषयक परंपरेत सिद्धांताला व भास्कराच्या परंपरेत चिकित्सा पद्धतीला प्राधान्य होते. दक्ष प्रजापतीकडून अश्विनीकुमारांनी समग्र आयुर्वेदाचे अध्ययन केले.

अमृत मिळवण्यासाठी औषधी निवडून काढणे व योग्य स्थानी त्यांची निपंच करणे हे अश्विनकुमारचे विशेष कार्य होय. यासाठी क्षीरसागराच्या भोवतीचा चंद्रपर्वत त्यांनी निवडला होता.

द्वितीय : पर्वतश्चन्दू सर्वोषधिसमन्वित:
अश्विम्याममृतस्यार्थि औषध्यस्तत्र संस्थिता
(संदर्भ वायुपुराण ४९ अध्याय)

अर्थ- (क्षीरसागराभोवतीच्या चार पर्वतांपैकी) दुसरा पर्वत चंद्र नावाचा असून त्यावर सर्व प्रकारच्या औषधी होत्या. अश्विनकुमारांनी अमृतप्राप्तीसाठी त्या तेथे लावल्या होत्या.

अश्विनकुमारांनी (Ashwin Kumar) वृद्धच्यवन ऋषींना आपल्या चिकित्सेद्वारे यौवन प्राप्त करून दिले. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्यांनी आयुर्वेद शास्त्रावर ग्रंथरचना सुद्धा केलेली आहे. हे ग्रंथ आज मितीला उपलब्ध नाही पण अश्विनसंहिता चिकित्सासारतंत्र अश्विनकुमार संहिता त्यांच्या ग्रंथाचे इतर ग्रंथात उल्लेख आढळतात.

अश्विनकुमारांनीच इंद्राला आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान प्रदान केले. इंद्रदेवांची आयुर्वेदाविषयीची रचना आज मितिला उपलब्ध नाही. परंतु त्यांचे इंद्रिय रसायन, सर्वतोभद्र, दक्षमूलाद्य तेल व हरितक्यलेह हे योग प्रसिद्ध आहेत. इंद्रदेवांनी भृगू, अंगीरा, अत्री, वशिष्ठ, कश्यप, अगस्त, पुलस्त्या, वामदेव, असित व गौतम या दहा ऋषींना आयुर्वेदशास्त्र अवगत करून दिले.

भृगू ऋषी (Bhrigu Rishi) हे चिकित्साप्रवीण होते, अत्रि हे मोठे आयुर्वेद तज्ञ होते, कश्यप ऋषींनी आयुर्वेद विषयक संहिता ‘वृद्ध जीवकीय तंत्र’ या नावाने प्रसिद्ध आहे. कश्यप ऋषींनी या ग्रंथामध्ये सिद्धी योग सांगितले आहेत. अगस्ती ऋषींनी भिषकक्रियाविषयक ” तंत्र या ग्रंथाचे लेखन केले आहे.

नावनीतक व चिकित्सासारसंग्रह या ग्रंथात अगस्ती ऋषींचे काही योग दिले आहेत. वामदेव ऋषींनी आयुर्वेदिक संहिता दिली आहे.

द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत अध्यापक
जळगाव
0257-2236815

Leave A Reply

Your email address will not be published.