लोकशाही विशेष रामउपासना
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामराया अयोध्या नगरीत आले म्हणून प्रतिवर्षी या दिवशी गुढी उभारून आपण स्वागत करतो. ती आपली परंपरा आहे. तो क्षण जसा भावपूर्ण, आनंद उत्सव करायला लावणारा ठरला तसाच आजचा दिवस ही याला अपवाद नाही. पुनश्च तोच भाव, तोच जल्लोष,आसमंत चैतन्याने भरलेला असे जन्मभूमी अयोध्येचे स्वरूप किंवा घराघरावर फडकणारा भगवा ध्वज हा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवावा असाच अद्वितीय व पवित्र आहे. त्याचे आपण सारे साक्षी आहोत ही खरच भाग्याची गोष्ट आहे.
“विजय पताका श्रीरामाच्या झळकती अंगणी I” “प्रभू आले हो मंदिरी I” आपल्या सर्वांच्याच मनीचा आनंद द्विगुणित करणारा आजचा परमपवित्र व अतिशय मंगल दिवस आहे. आज 22 जानेवारी 2024 प्रभुंची जन्मभूमी अयोध्यानगरीत त्यांच्या सगुण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे. श्रीरामप्रभू आपली अस्मिता आहे. आपले आराध्य दैवत आहे. उपासनेचा मुकुटमणी आहे. विश्वाचा विश्राम, आनंदाचे धाम, चिद्रत्त्नांची खाण, प्राणांचाही प्राण, देवांचाही देव, भक्तपूर्णकाम व शिवाचा ही आराम असे त्यांचे स्वरूप आहे. या जगतात ज्ञानदृष्टीने पाहू जाता किंवा विवेकाने पाहता ‘श्रीराम’, ‘राम’ हेच एक सत्य आहे. आपण त्यांच्या पावन चरणी नतमस्तक व्हावे याला अन्य कोणताही पर्याय असुच शकत नाही.
श्रीरामांचा संपूर्ण जीवनपट हा अनुकरणीय व अभ्यासनीय आहे. अनेक दैवी गुणांनी मंडित असे रामराया आदर्शभूत आहेतच व आजही मार्गदर्शक ठरावेत असेच आहेत. एक पुत्र म्हणून, पती म्हणून, बंधु किंवा सखा म्हणून, दास अथवा शिष्य म्हणून, राजा किंवा पिता म्हणून त्यांची त्या त्या भूमिकेतील प्रत्येक कृती ही वंदनीय आहे. म्हणूनच एकवचनी, एकबाणी असे हे दैवत हृदय पटलावर सर्वांच्याच कायम विराजमान आहे.
अजन्मा जन्मास आला असला तरी त्यांचा जन्म ‘कौसल्यानंदन’ म्हणून आनंद देणाराच आहे. गदिमांचे गीत रामायण मधील “राम जन्मला ग सखे राम जन्मला” हे गीत कानी पडताच आजही नकळत नयनात अश्रू बरसू लागतात. “ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजणिया रे” असं पद ऐकताच त्यांचे मोहक बालस्वरूप आपल्याला आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. सीतेचे स्वयंवरही त्यांचा पुरुषार्थ सिद्ध करून दाखवणारा आहे. एकाच वेळी सर्व नातेसंबंधात ‘सभ्यता’ दाखवणारे प्रभू राक्षसांचे कंदन करताना कठोर होतात व धर्म संस्थापक बनतात म्हणूनच तर आपण म्हणतो,”राम का गुणगान करिए राम की सभ्यता का वीरता का ध्यान धरिये राम का गुणगान करीए” त्यांच्या अद्वितीय गुणांचा अभ्यास हा आपल्याही भक्ती मार्गातील एक प्रमुख टप्पा असावा.
आपल्या दैनंदिन उपासनेत श्रीराम हे व्यापून राहिलेलेच आहेत. प्रातःस्मरणात रामांच्या बारा नावांचा प्रथम उल्लेख येतो. राम, श्रीराम, पतितपावन, जानकी जीवन, सीतापती राम, सीताशोधन, दाशरथेय राम, कौसल्यानंदन, अहिल्याउद्धरण, त्राटिकामर्दनम, तुलसीत्रिभुवन राम, मारुतीदर्शनम राम असा त्यांचा उल्लेख आहे.
” प्रभाते मनी राम चिंतीत जावा I”
“पुढे वैखरी रामा आधी वदावा I “
“सदाचार हा थोर तो सांडू नये तो I”
“जगी तोचि तो मानवी धन्य होतो I”
म्हणजे मनाने रामाचे चिंतन, त्यांचे मुखाने नामस्मरण व त्यासोबत आपले सदाचरण या गोष्टी हातात हात घालून आपली भक्तीची मार्गक्रमणा व्हायला हवी. “कोमल वाचा दे रे राम I विमलकरणी दे रे राम I” आणि शेवटी “दास म्हणे रे सद्गुणधाम I उत्तम गुणमज दे रे राम I” असेच मागणे प्रतिदिनी मागावे. श्रुती- स्मृती ही सांगतात ‘राम परब्रम्ह आहे’ त्याचं स्वरूप सत्-चित्- आनंदस्वरूप आहे. चराचरात सर्वव्यापी तो चैतन्य रूपाने नटलेला आहे म्हणून सायंकाळी जी रामरक्षा आपण म्हणतो त्यातही असाच राम प्रकट असतो.
” माता रामो मत्पिता रामचंद्र:”
” स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:”
“सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर्नान्यं
“जाने नैव जाने न जाने”
आपण या स्त्रोताचे पठण करतो. श्री रामरायाचे आज त्यांच्या जन्मभूमीत, अयोध्या नगरीत आगमन झाले आहे. ते जन्मभूमीचे स्थान महात्म्य अनन्यसाधारण असणारच आहे. पण तो केवळ अयोध्या नगरी हे क्षेत्र, विशिष्ट तीर्थ किंवा आश्रमात तसेच एका विशिष्ट देऊळ किंवा मंदिरापुरता मर्यादित नाही. त्याला आपल्या हृदयातच अढळ स्थान दिले पाहिजे.
“रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील…”
“मी न अहिल्या शापित नारी”
“मी न जानकी राजकुमारी”
“दीन रानाची वेडी शबरी”
तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना असा भाव ठेवून आपली ही साधना व्हायला हवी. तो दिनवत्सल, भक्तवत्सल असा रघुकुलटिळक कृपा केल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामाचा शोध घेताना त्यांचे सगुण साकार रूप डोळ्यात साठवावे. त्यांचे राजीवलोचन, अजानबाहु, अभयंकर व कोदंडधारी असा सर्वांगाने सावळा असणारा राम खरंचच लावण्याची खाण आहे. पण त्याचबरोबर या श्रीरामांचा सप्रेमाने, सश्रद्धेने, शांत एका ठिकाणी बसून केलेला नामउच्चार हा अतिशय फलदायी आहे. बाहेरून आत असाही त्यांचा शोध घ्यावा कारण,
“हृदयामाजी मी राम असता सर्व सुखाचा आराम”
“त्या भ्रांतासी तो काम विषयांचा…”
हा अनुभवाचा विषय आहे. यासाठी विषयांचा त्याग नाही करावयाचा तर काही काळ कानाने ऐकणे, डोळ्यांनी बाहेरच पाहणे, मनाने स्वैर धावणे, हाताने काहीतरी करतच असणे यावर थोडा लगाम घालण्याची काही काळ सवय लावायची आहे व श्रीराम प्रभूंचे ध्यान साधावयाचे आहे. नवीन वर्षात सर्व संत महंतांनी अविरत कष्ट करून जी रामकथा ब्रम्हांड पैलिकडे नेली तिचे ॠण फेडण्यासाठी आपण ‘रामउपासने’ साठी निश्चित वेळ काढूया. सातत्याने, सप्रेमाने काही थोडा काळ त्यांचे नामस्मरण करूया.
आज भौतिक ज्ञानाच्या कक्षा खूप रुंदावल्यात. ते ज्ञानग्रहण करणे व जीवनासाठी आवश्यक असलेल्या पैसा मिळविणे याचा परिघ इतका रुंदावत चालला आहे व त्या पाठोपाठ नकळत येणारा अहंकार आपल्याला सवडच देत नाही. तरुण वर्गाने आता हिरीरीने याचे दायित्व घेतले पाहिजे आणि “उपासनेला दृढ चालवावे” असा संकल्प यानिमित्ताने प्रभू रामराया यांच्या चरणी सोडायला हवा.
जय श्रीराम
लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे