देशभरात आनंदोत्सव

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

गेल्या ५०० वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाचे फलित म्हणजे आज २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होय. सन १५२० पासून अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीत श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठीचा संघर्ष चालू होता. प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू होऊन आज त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक क्षणाचे देशातील कोट्यावधी जनतेला साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे. सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या या मंदिर प्रतिष्ठापनेमुळे अयोध्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे. अयोध्येतील या श्रीराम मंदिराने अनेक जागतिक विक्रम केले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ७० एकर जागा या मंदिराची असून त्यातील अडीच एकरात प्रत्यक्ष श्रीराम मंदिराचे बांधकाम होत आहे. हजारो वर्षा या मंदिराचे बांधकाम टिकावे म्हणून राजस्थान येथील लाल रंगाच्या ग्रॅनाईट दगडात त्याचे बांधकाम केले जात असून त्यासाठी एकूण ४०० कोटी रुपये बांधकामासाठी खर्च लागणार आहे. ४० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून ६० टक्के बाकी राहिलेले काम येत्या डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. परंतु पौष महिन्यातील २२ जानेवारीचा मुहूर्त मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा निघाल्याने त्याची विधिवत पूजा करून त्याचे लोकार्पण होत आहे. मंदिराच्या प्रतिष्ठापना मुहूर्तावरून शंकराचार्यांपासून ते काहींमध्ये मतभेद असले तरी हा मुहूर्त योग्य असल्याचे काही विद्वान ज्योतिषांचे मत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत आहेत.

हजारो मुख्य निमंत्रकांच्या उपस्थितीत लाखो राम भक्तांच्या गर्दीचा उच्चांक अयोध्येत लोटला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मिळेल त्या वाहनाने अयोध्येत पोहोचले आहेत. त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा हा क्षण देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणता येईल अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्मितीचे श्रेय कोण्या एका पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण भारतातील अनेक राम भक्तांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. तसेच राम जन्मभूमी मंदिर निर्माण करण्यासाठी अनेक रामभक्तांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानातून हे मंदिर उभे राहिले आहे. तसेच हजारो जखमी राम भक्त आणि मंदिर निर्माणासाठी संघर्ष करणाऱ्या भाविकांना श्रीराम मंदिर निर्मितीचे श्रेय आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या काळात त्याचे लोकार्पण होत असले तरी त्याला राजकीय रंग देणे योग्य होणार नाही. ५०० वर्षाच्या संघर्षातून हे राम मंदिर उभे राहिले आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यामुळे अयोध्या नगरी तर सजलीच आहे; परंतु देशातील सर्व राज्यातील रामभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. जळगाव जिल्हाही त्यात मागे नाही. सर्वत्र भगवामय वातावरण आणि रांगोळ्यांनी आणि विजेच्या लखलखाने रस्ते आणि इमारती सजलेल्या आहेत. जळगाव शहरात जैन उद्योग समूहाने टॉवर चौकात शास्त्री टावर वर उभारलेली ८० फुटाची श्रीरामाची भव्य प्रतिमा जळगावकरांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक आणि काव्यरत्नावली चौकात श्रीरामाच्या भव्य प्रतिमा आणि विजेच्या रोषणाईने झगमकाठ निर्माण झाला आहे. त्याचबरोबर गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान आणि गौराई उद्यानात आकर्षक रोषणाई केली आहे.

शहरातील ५१ मंदिरांमध्ये जैन उद्योग समूहातर्फे भाविकांना केळी वाटप करण्यात येत असून कार्यकर्त्यांना पेढे वाटण्यात येत आहेत. जळगाव शहरात आनंदोत्सवाचे भरते आले आहे. जिल्हाभरात चैतन्य पसरले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद प्रत्येकाला घेता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सोमवार दिनांक २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या ऐतिहासिक क्षणाचा लाभ सर्वांना घेणे सुलभ होणार आहे. प्रतिष्ठापना सोहळ्यास दैनिक लोकशाहीच्या शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.