अट्टल वाळूचोरटा संजय त्रिभुवन हद्दपार…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सतत वाळू चोरीमधे सहभागी असणारा वाळूचोरी पथकावर हल्ला करणे, मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणे, वाळूचे वाहन पथकाला धमकावून पळवून नेणे, अनेक गुन्हे दाखल असतांना त्याच्या भिती व दहशतीमुळे साक्ष देण्यासही कुणी तयार होत नसलेल्या आडदांड व गुंड प्रवृत्तीच्या भडगाव तालुक्यातील वाक येथील संजय सुरेश त्रिभुवन (वय – २५) यास अखेर पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी एका वर्षासाठी जळगांव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पाचोरा विभागातील आजपर्यंत वाळू चोरट्यास हद्दपारीची ही सर्वात मोठी कारवाई झाल्याने तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवालांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र पाचोरा व भडगाव तालुक्यातील वाळू चोरट्यांना हा एक प्रकारे चांगलाच चपराक बसला आहे. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी कौतुक केले आहे.

भडगाव तालुक्यातील वाक येथील संजय सुरेश त्रिभुवन यांचेवर भडगाव पोलिस ठाण्यात वाळू चोरी रोखणाऱ्या पथकावर हल्ला करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे, वाळूचे वाहन पळवून नेणे या विषयी चार गुन्हे तर पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ही अनेक गुन्हे दाखल आहेत. या संजय त्रिभुवण याने सन – २०२० मध्ये वाळू चोरी रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या तलाठी एन.के. पारधी व व्ही.पी. शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यावेळी पाचोरा व भडगाव येथील पोलीस निरीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला असल्याने अप्पर पोलिस अधीक्षक यांनी दि. ८ मार्च २०२२ रोजी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ नुसार हे प्रकरण उपविभाग पाचोरा यांचेकडे सादर केल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी चौकशी अंती संजय त्रिभुवन हा अतिशय क्रुर, खुन्शी व गुंड प्रवृत्तीचा त्यास कोणी वाळू चोरीस मनाई करण्यासाठी गेले असता त्यांचेवर हल्ला करण्याची सवय झाली असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याला एक वर्षासाठी जळगांव जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय तो ज्या जिल्ह्यात वास्तव्य करीत असेल त्या ठिकाणी जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात महिन्यात एक वेळ हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या या कारवाईमुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.