असीफ अली झरदारी पाकचे नवे राष्ट्रपती

0

इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) सहअध्यक्ष असीफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे १४वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ६८ वर्षीय झरदारी देशाच्या सर्वोच्च पदावर दुसऱ्यांदा पोहोचले आहेत. ते रविवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पाकिस्तानात पीपीपी आणि नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, झरदारी या आघाडीचे उमेदवार होते.

तर त्यांच्याविरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन असलेले सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे महमूद खान अचकझई हे उभे होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. नवनिर्वाचित खासदार आणि चार प्रांतीय विधानसभांचे आमदार यांनी मतदान केले. चार वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. झरदारी यांना ४११, तर अचकझई यांना १८१ मते पडली. संसद आणि खैबर पख्तुनख्वा वगळता उर्वरित तीन विधानसभांमध्ये झरदारी यांनी आघाडी घेतल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. झरदारी हे यापूर्वी २००८ ते २०१३ या कालावधीत राष्ट्रपती होते.

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या निवडीबद्दल झरदारी यांचे अभिनंदन केले. पराभूत उमेदवार अचकझई यांनीही झरदारी यांचे अभिनंदन करताना, निवडणूक निःष्पक्षपणे पार पडल्याची प्रतिक्रिया दिली. पाकमध्ये प्रथमच मतांची खरेदी-विक्री न होता निवडणूक पार पडल्याचे ते म्हणाले. झरदारी हे पाकच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा निवड झालेले पहिले राजकीय नेते आहेत. आतापर्यंत परवेझ मुशर्रफ यांच्यासारखे लष्करप्रमुख सत्ता उलथवून या पदावर एकापेक्षा अधिक टर्म राहिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.