आनंद कुमार : समर्पित व्यक्तिमत्व

0

एसडी-सीड हे नाव माहित नाही, असा एकही व्यक्ती जिल्ह्यात सापडणार नाही. याच एसडी-सीडचे सर्वेसर्वा आदरणीय सुरेशदादांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जे काही न चुकविण्यासारखे कार्यक्रम आपल्या एसडी-सीड मार्फत घडविले जातात, त्याला तोड नाही. अखिल भारतातून शिक्षण क्षेत्रातील नायाब हिरे निवडून हे कार्यक्रम आयोजिले जातात.

या शैक्षणिक वर्षातील कार्यक्रमाचा योगायोग बघा. मागील वर्षी प्रज्ञाचक्षू गणितज्ञ डॉ.सुषमा विरमणी आणि डॉ.पी विरमणी, चेन्नई यांचे प्रभावी मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना लाभले. यावर्षी देखील गणितातीलच तज्ञ, जगप्रसिद्ध प्राध्यापक, सुपर थर्टीचे जनक, तसेच गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचे तरंग निर्माण करणारे त्यांचे स्वप्न फुलविणारे पद्मश्री डॉक्टर आनंदकुमारजी आपणास मार्गदर्शन करणार आहेत. यापेक्षा अजून कोणता आनंद मोठा असू शकतो? त्यांच्या आयुष्यातील काही घटना काही प्रसंग अर्थात त्यांचा अल्पसा परिचय असा आहे.

डॉ.आनंद कुमार एकनिष्ठ व समर्पित असे गणित या विषयाचे शिक्षक की जे “सुपर थर्टी” या प्रणाली साठी नावाजले आहेत.

डॉ.आनंद कुमार यांचा जन्म एक जानेवारी १९७३ रोजी पटना (बिहार) येथे आर्थिक परिस्थितीने साधारण अशा कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोस्ट खात्यात नोकरी करीत होते. आनंद कुमार यांचे शिक्षण पटना येथील हिंदी मिडीयम च्या सरकारी शाळेत झाले. शाळेत असतानाच त्यांच्यामध्ये गणित या विषयाची आवड निर्माण झाली. गणित या विषयातील उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांचे ‘नंबर थिअरी’ मधील शोधनिबंध ‘स्पेक्ट्रम’ या अतिशय नावाजलेल्या गणित मॅगझिनमध्ये प्रकाशित झाले. त्यांना केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता परंतु वडिलांचे निधन व साधारण आर्थिक परिस्थिती यामुळे तेथे जाऊ शकले नाही.

१९९२ साली त्यांनी गणित विषय शिकवायला प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी महिना ३०० रुपये भाड्याची एक खोली घेतली तेथेच त्यांनी आपले स्वतःचे “रामानुजन स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स” सुरू केले. सदर संस्थेत सुरुवातीला फक्त दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले, परंतु संस्थेने उंच भरारी घेत केवळ तीन वर्षातच प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ५०० पर्यंत गेली.

दरम्यान ज्या गरीब विद्यार्थ्यांना आय.आय.टी. च्या प्रवेश परीक्षेची तयारी करायची होती, परंतु गरीबी मुळे ते फी भरु शकत नव्हते.असे काही विद्यार्थी डॉ. आनंद कुमारांच्या संपर्कात आले. गरीबी मुळे काही हुशार व होतकरू विद्यार्थी या परीक्षेपासून व शिक्षणापासून वंचित राहतात.त्यांचे आयुष्य गरिबीमुळे उध्वस्त होते. पूज्य साने गुरुजी आपल्या लिखाणात म्हणतात, बागेतील असंख्य कळ्या उमलण्यापूर्वीच परिस्थितीरुपी किटकांमार्फत कुरतडल्या जातात. ही बाब त्यांच्या हळव्या व संवेदनशील मनाला वेदना देऊन गेली. आपण अशा गरीब पण हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी काही तरी ठोस पाऊल उचलल पाहिजे असा निर्धार त्यांनी केला. म्हणून त्यांनी २००२ साली जे गरीब विद्यार्थी आपल्या हालाखीच्या परिस्थिती मुळे फी भरू शकत नाही, तसेच स्वतःच्या गरजा ही भागवू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुपर थर्टी प्रणाली सुरु केली. अशी प्रणाली की जीच्या मुळेच आज डॉ. आनंद कुमार ओळखले जातात.

रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब परंतु आयआयटीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जात असे. या परीक्षेत टॉप थर्टी मुलांची निवड होत असे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आनंद कुमार विनामूल्य शिक्षण देत असत. तसेच त्यांची राहण्या खाण्याची सोय सुद्धा ते स्वतः करीत. मुलांच्या राहण्याच्या सोयीचे मॅनेजमेंट करण्याच्या कामात त्यांचे बंधू प्रणव कुमार त्यांना मदत करीत. त्यांच्या आई जयंती देवी स्वतः मुलांसाठी जेवण बनवत असत. अशा प्रकारे २००२ पासून “सुपर थर्टी” प्रणाली चे थोर काम सुरू झाले.

२००३ ते २०१८ यादरम्यान एकूण ५१० विद्यार्थ्यांपैकी ४२२ विद्यार्थी आयआयटी पास झाले. २०१० मध्ये “सुपर थर्टी” चे सर्व विद्यार्थी आयआयटी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले. अशाप्रकारे रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मधील “सुपर थर्टी” प्रणाली वृद्धिंगत होत गेली. या कामासाठी आनंदकुमार यांनी कुठल्याही प्रकारचे सरकारी सहाय्य घेतले नाही. आनंदकुमार यांना स्वतःच्या प्रयत्नांनी “सुपर थर्टी” चे कार्य कायम चालू ठेवणाची इच्छा होती.

आनंद कुमार यांच्या या थोर कार्याचा सन्मान देशातील व विदेशातील अनेक संस्थांनी केला. काही महत्त्वाचे पुरस्कार मी येथे नमूद करीत आहे.

# ८ नोव्हेंबर २०१८ मध्ये आनंद कुमार यांना दुबई येथील मलबार गोल्ड अँड डायमंड द्वारा “ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड २०१८” ने सन्मानित करण्यात आले.

# २०१८ मध्ये भगवान महावीर फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल “महावीर पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

# कॅलिफोर्निया येथील फाउंडेशन फॉर एक्सलन्स (FFE) या संस्थेने “एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड २०१९” या पुरस्काराने आनंदकुमार यांना सन्मानित केले.

# २०२२ मध्ये डॉ.आनंद कुमार यांना “गणित रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

# २०२३ मध्ये भारत सरकारने डॉ. आनंदकुमार यांचे साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदान बद्दल “पद्मश्री ” देऊन गौरविले.

डॉ.आनंद कुमार यांचे कार्य व चरित्र इतके महान व उल्लेखनीय आहे की त्याची भारतीय फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा दखल घेतली . त्यांचे कार्य व योगदान सिनेमाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचविले २०१९ मध्ये दिग्दर्शक विकास भाई यांनी “सुपर थर्टी” हा चित्रपट आनंद कुमार यांच्या जीवन व कार्यावर प्रसारित केला. या चित्रपटात आनंदकुमार यांची भूमिका हृतिक रोशन या नावाजलेल्या कलाकाराने उत्कृष्ट साकारली आहे.

असे अनेक पुरस्कार व सन्मान डॉ.आनंद कुमार यांना त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे मिळाले. पण म्हणतात ना सोन्याला सुद्धा कस द्यावाच लागतो तसेच आनंद कुमार यांच्या बाबतीत घडले. त्यांना विरोधक होते जे “सुपर थर्टी” च्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवीत होते. सुपर थर्टी चा निकाल टॉप मोस्ट असून सुद्धा ” सुपर थर्टी चा निकाल अत्यल्प दोन टक्के आहे” अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवीत होते. एवढेच नाही तर विरोधकांनी दुसरे रामानुजन स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स स्थापन करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. परंतु सोने हे सोनेच असते आनंदकुमार या विरोधकांना डगमगले नाही. त्यांनी आपले कार्य अव्याहत सुरू ठेवले.

त्यांच्या व्यक्तिगत जीवनात ही काही अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. २०१९ मध्ये त्यांना प्रकृतीस त्रास झाला. एक दुर्लभ ब्रेन ट्यूमर झाल्यामुळे त्यांना त्यांच्या कानाने ऐकण्यास कमी येऊ लागले. त्यांची मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी झाली. परंतु प्रबळ इच्छाशक्ती मुळे ते या संकटातूनही बाहेर आले व आपले कार्य चालू ठेवले. खरं आहे, देव तारी त्याला कोण मारी?

नावा प्रमाणेच आनंद कुमार यांनी ज्ञानदानाचा आनंद उपभोगला व आनंद वाटला. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात तसे ,”आनंदाचे डोही आनंद तरंग…….”

 

प्रा.एस. व्ही. सोमवंशी,

सल्लागार मंडळ सदस्य,

एस. डी. सीड, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.