अंतर्मुखी सदा सुखी – पू. जयेंद्रमुनी

0

 

प्रवचन सारांश – दि. 13/08/2022

 

जन्माला आलेल्या प्रत्येकाला या जगाचा निरोप घेऊन जावेच लागते. मृत्यू येण्याआधी आपण आपल्या हातून सत्कर्म करावे, काहीतरी चांगले करून जावे. मनुष्य जन्म सौभाग्याने मिळत असतो. प्रत्येकाला परमात्मा नव्हे तर, भौतिक, संसारिक सुख हवे असते. संसारिक सुख तनाला सुखावणारे असते. ते सुख क्षणभंगुर असते परंतु, आध्यात्मिक सुख हे शाश्वत, कायमचे सुख असते. असे म्हणतात, ‘अंतर्मुखी सदा सुखी…’ याबाबतचे विचार डॉ. पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य पू. जयेंद्रमुनी यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.

 

जय गच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पार्श्वचंद्रजी म.सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव  येथील स्वाध्याय भवन येथे चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

 

आपल्या प्रवचनात गाव आणि शहर यांच्या संस्कृती बद्दल ते म्हणाले की, गाव व शहर संस्कृती भिन्न असते. तुम्ही गावी गेलात की ‘अतिथी देवो भव’ याची प्रचिती येते. शहरात गेलात की मुख्य गेट जवळच ‘कुत्र्यापासून सावधान’ असे लिहिलेले असते. गावी गाई गोठ्यात बांधलेल्या असतात व कुत्रे मोकळे असतात. शहरात मात्र कुत्र्यांना बांधलेले असते आणि गाई रस्त्यावर मोकाट सोडलेल्या असतात. जीवनात पैशाला महत्व आहे;  परंतु जीवनात पैसाच सर्व काही आहे असे नव्हे. ऑपरेशन यशस्वी झाले परंतु काही क्षणानंतर रुग्ण मृत्युमुखी पडला तर त्या यशस्वी ऑपरेशनचा काय फायदा! जीवनभर धनाच्या मागे आपण पळू नये. अति लोभ तर नसावाच. लक्षात ठेवा, कुणालाही दुःख देऊन प्राप्त केलेले धन हे कधीच सुख देऊ शकत नाही. सुखी जीवन जगायचे असेल तर “जो प्राप्त है वो पर्याप्त है…” हा मंत्र सतत लक्षात ठेवावा. संसारातील चार खड्डे कधीच भरून निघत नाहीत. संसार, समुद्र,  तृष्णा इत्यादी हे कधीच भरून निघत नाहीत. मानवी खोपडी संतोषने भरलेली असेल तर ती व्यक्ती सुखी असते. आपल्या प्रवचनात रंजक कथा त्यांनी सांगितली. सुख आपल्यातच असते पण दुसऱ्याचे सुख पाहून आपल्याला इर्षा निर्माण होते. एक शेठजी असतात, ते धनदौलत कमावण्यासाठी विदेशात गेलेले असतात. बारा वर्षे खूप मेहनत करून त्यांनी सोन्याच्या रुपात आपल्या पत्नी मुलांसाठी धनदौलत आणलेली असते. प्रवासात रस्त्यात जाताना त्यांना एक अपरिचित व्यक्ती भेटते. ती व्यक्ती गोड बोलणारी असते, पण ठग असते. शेठजींना लुटायचा पूर्ण प्रयत्न ठग करत असतो. दोन रात्री ते दोन्ही सोबत असतात परंतु ठग शेठजींची संपत्ती शोधू शकत नाही. शेटजी त्या ठगाला आपल्या घरी नेतात. आपल्या पोटलीतून पाच सुवर्णमुद्रा ठगाला देतात. त्याला प्रश्न पडतो की शेटजींनी ही पोटली ठेवली तरी कुठे होती? शेवटी न राहून ठग विचारतो, ‘शेठजी तुम्ही ही सोन्याची पोटली ठेवली तरी कुठे होती?’ त्यावर शेठजी म्हणतात, ‘अरे वेड्या, तू झोपेच्या आधी काही कामासाठी बाहेर पडायचा. त्याचवेळी मी ही पोटली तुझ्या उशीखाली ठेवत असे. तू माझ्याकडे ते शोधत होता … परंतु तू ते तुझ्याकडे शोधले नाही, म्हणून माझे धन सुरक्षित राहिले. सांसरीक जीवनामध्ये आपली आपली ही अशीच अवस्था होते. आपल्यात अंतरात्म्यात सुख असते; पण ते दुसरीकडे शोधत असतो. म्हणून ‘अंतर्मुखी सदा सुखी!’ हे आपण लक्षात घ्यावे आणि सुखी व्हावे असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले.

—————-■■————

 

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.