जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 102 वरील रुग्णवाहिका चालकांना गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. या संदर्भात वाहनचालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून चालकांना त्वरीत मानधन देण्याचे आदेश सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी दिले आहेत. दरम्यान वाहनचालकांकडून सदर ठेका रद्द करण्याची मागणी होत असून मानधन नको पण ठेका रद्द करा अशी हाक देण्यात येत आहे.
मुंबई स्थित राजछाया इनोवेटिव्ह सर्व्हिस या कंपनीला जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचा ठेका देण्यात आला असून कंपनीने चालकांना मानधन देण्यास टाळाटाळ चालविली आहे. मध्यंतरी चालकांनी जिल्हा शल्स चिकित्सकांना निवेदन देवून सदर ठेका रद्द करण्याची मागणी केली होती. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने चालकांनी मुंबर्इ गाठत आरोग्य सहसंचालकांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते. दरम्यान याची दखल संचालकांनी घेतली असून संबधित ठेकेदाराला चालकांचे मानधन त्वरीत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठेका रद्द करा : चालकांची मागणी
राजछाया इनोवेटिव्ह सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून चालकांना मानधन दिले जाते. अन्य जिल्ह्यातील ठेके रद्द करण्यात आले असतांनाही जळगाव जिल्ह्यातील ठेका का रद्द केला जात नाही असा प्रश्न चालकांनी उपस्थित केला आहे. सदर कंपनी चालकांनी तुटपुंजे मानधन देत असून या कंपनीचा ठेका रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.