अमळनेर विधानसभा निवडणुकीपूर्व अतीशबाजी

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांचे सोबत जाऊन मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. जळगाव जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या अनिल भाईदास पाटलांची मंत्रिपदाच्या रूपाने जणू लॉटरीच लागली. परंतु पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संबंध पाहता शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवारांचा गट काही समाधानी नाही. मंत्री मंडळात समाविष्ट झाल्यापासून अजित पवार यांचे अनेक वेळा रुसवे फुगवे दिसून आलेले आहेत. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे दिलेले आश्वासन भाजपतर्फे पाळले जाणार नसल्यामुळे अजित पवार नाराज आहेत. ही नाराजी पालकमंत्रीपदाच्या नेमणुकीवरून दिसून आलेली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नजीकचे समजले जाणारे भाजपचे मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हिसकावून घेण्यात अजित पवार यशस्वी झाले. त्यामुळे अजित पवारांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत तर अजित पवार कोणतीही टोकाची भूमिका घेऊ शकतात. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांना त्यांच्या मनाप्रमाणे लोकसभा उमेदवारांचे उमेदवारी मिळण्यास अडचण आली तर त्याचवेळी टोकाची भूमिका ते घेऊ शकतात. त्यांचीच एक झलक म्हणजे अमळनेरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केलेले वक्तव्य होय. दिवाळी अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोड बातमी मिळू शकते, असे अनिल पाटलांनी खळबळ जनक वक्तव्य केले. या वक्तव्याचा मतितार्थ असा की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिलजमाई होऊन ते एकत्र येऊ शकतात, असा होय. अनिल पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार यांनी अनिल भाईदास पाटलांविषयी खळबळ जनक वक्तव्य केले. अनिल पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येणार नाहीत, अशा प्रकारची व्यूहरचना करण्यात येत आहे.

अनिल पाटलांचे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे केलेले प्रयत्न, केलेल्या वक्तव्याचा धक्का देणारे अथवा त्याच्या विपरीत अनिल पाटील यांचे विरुद्ध शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल भाईदास पाटलांविरुद्ध पर्यायी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनिल भाईदास पाटील यांच्या विजयात माजी आमदार साहेबराव पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. त्यातच माजी अपक्ष आमदार शिरीष दादा चौधरी यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या नेत्यांनी त्यांना दगा दिला. अन्यथा अपक्ष म्हणून शिरीष दादा चौधरी यांनी निवडणूक लढवली असती, तर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे चित्र काही वेगळेच राहिले असते. त्यामुळे 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिरीष दादा चौधरी हे पुन्हा अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे कळते. त्यामुळे शिरीष दादा चौधरींची अपेक्षा उमेदवारी अनिल भाईदास पाटलांना जड जाऊ शकते. त्यात माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी शरद पवार गटातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली तर अमळनेर विधानसभा निवडणुकीत रंग देणार आहे. भाजप तर्फे 2024 च्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल किंवा महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप तर्फे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल पाटलांना पाठिंबा दिला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

अमळनेर तालुक्यातील शेतकरी तसेच सर्वसामान्य जनता मंत्री अनिल भाईदास पाटलांच्या कार्यावर कमालीची नाराज दिसून येते. अमळनेर तालुक्याची लाईफ लाईन असलेल्या पाडळसे धरणाच्या विलंबाबाबत तालुक्यातील शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत. अनिल भाईदास पाटलांकडून अमळनेरकरांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या. या धरणाच्या पूर्णते संदर्भात त्यांनी मोठमोठी आश्वासन दिली होती. परंतु त्यांचे आश्वासन फोल ठरले होते. हे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावरून राज्य व केंद्र शासनाला घरचा आहेर दिला. पाडळसे धरणाच्या विलंबाला महाराष्ट्रातील सत्ताधारी नेतेच जबाबदार असल्याचा आरोप खासदार उन्मेष पाटलांनी करून महाराष्ट्राच्या शिंदे फडणवीस, अजित पवार सरकारची पोलखोल केली. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी खोटे आश्वासन देऊन अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची तसेच जनतेची फसवणूक केली, हे स्पष्ट होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी येणाऱ्या अडचणीला तोंड देण्यासाठी शरद पवार व अजित पवार एकत्र येणार असल्याचे वक्तव्य अनिल भाईदास पाटलांकडून केले जाते आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच फटाक्यांची आतिषबाजी होत आहे. त्यामुळे ही फटाक्यांची अतिषबाजी कुणाच्या पथ्यावर पडेल, हे काळच ठरवेल. परंतु आज तरी मंत्री अनिल भाईदास पाटलांना निवडणुकीत धक्का देणार या शरद पवार यांच्या वक्तव्याने खडबड उडाली आली आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.