धक्कादायक; महाआरती दरम्यान भाविकांवर पत्र्याचे शेड कोसळले… ७ ठार…

0

 

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अकोला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने कडुलिंबाचे झाड पत्र्याच्या शेडवर पडले. या शेडखाली अनेक भाविक उभे होते. त्यातील अनेक जण त्याखाली दाबले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, झाड पडल्याने 35 ते 40 भाविक दाबले गेले. ज्यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. शेडखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

स्थानिक हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोकांनी झाड तोडण्यात मदत केली. दाबलेल्या लोकांना गॅस कटरने शेड कापून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी, बचाव पथक पोहोचले. अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानच्या सभागृहात झाड पडल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करण्यात यावेत, असेही निर्देश देण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.