ऐनपुरात घरांच्या पुनर्वसनसाठी भूमिगत आंदोलन…

0

 

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

विविध निवेदने देऊन सुद्धा पुनर्वसन होत नसल्याने दि.१८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुनर्वसन संघर्ष समिती ऐनपुर यांच्यातर्फे स्मशानभूमीत भुमिगत आंदोलन करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे पुनर्वसन संघर्ष समिती मार्फत हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे ऐनपुर गावातील तिन्ही बाजूंनी बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात साठलेले आहे. या भागात राहणाऱ्या लोकांची घरे बॅक वॉटरच्या पाण्यापासून अगदी १५ ते २० फुट अंतरावर येत असते, या घरांना जमिनीतून ओलावा लागलेला असून घराच्या भिंती उन्हाळ्यातही ओल्या असतात. त्यामुळे हे घरे केव्हा पडतील हे सांगता येत नाही. या भागात डास, जनावरे, सर्प, घोणस, नाग, अजगर व मगरासारखे हिंस्र जलचर प्राण्यांपासून जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागाची पाहणी पुनर्वसन विभाग व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी झालेली असून, या परीसरातील २५० घरे ही रेड झोन मध्ये आहेत. ही घरे तात्काळ उठवली जावी यासाठी संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून भागातील संबंधित मंत्री महोदय, स्थानिक प्रतिनिधी, आमदार, खासदार, स्थानिक व जिल्ह्यातील अधिकारी यांना कल्पना आहे. याबाबत वेळोवेळी पुनर्वसन अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

दरम्यान याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ऐनपुर येथील स्मशानभूमीत भुमिगत आंदोलन केले. यावेळी दिपराज बागुल सहाय्यक कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग १, प्रेमसागर कळमकर कनिष्ठ अभियंता मध्यम प्रकल्प विभाग १, युवराज ढाके स्थापत्य सहायक मध्यम प्रकल्प विभाग १ व रावेर चे तहसिलदार बंडू कापसे यांनी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण सोडले. या उपोषणात पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर महाजन, उपाध्यक्ष शेख हारून, सचिव अनिल वाघोदे, संदिप महाजन, जगन्नाथ महाजन, प्रमोद पाटील, युसुफ शेख, चंद्रगुप्त भालेराव, शरद अवसरमल, गोपाल बारी, रामदास पाटील, हुसेन शेख, सरपंच अमोल महाजन, अनिल जैतकर, सुनिल खैरे, अतुल पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी, ऐनपुर मंडळाचे मंडळ अधिकारी शेलकर, तलाठी विजय शिरसाठ तसेच नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.