मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकरी राजाची यंदाची दिवाळी गॉड होणार आहे. दुष्काळ आणि दुबारपेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे. त्यामुळे पीकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
बळीराजाला दिलासा
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या बीड जिल्ह्यात ७ लाख ७० हजार अर्जदारांसाठी २४१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली असून सरकारच्या या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
राज्यात उशीराने दाखल झालेला मान्सून आणि त्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने मारलेली दडी, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. सरकारने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, तसेच पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली.
मात्र पीकविमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेतली. इतकंच नाही तर पीकविमा कंपन्यांनी आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीचे अपील केले होते. हे दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले. यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विमा कंपन्यांची राज्यव्यापी बैठक घेऊन सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत भूमिका घेतली. दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळाला नाही, तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी कृषीमंत्र्यांनी जाहीर केली होती.
अखेर भारतीय पीकविमा कंपनीने आपले आक्षेप मागे घेतले असून, राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी १७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.