रावेरसाठी उद्योगपती श्रीराम पाटलांचे नाव चर्चेत..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले, तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तर रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेला आलेली आहे. जळगाव जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे काही नावांच्या बाबतीत प्रदीर्घ विचार विनिमय चालू आहे. तर रावेर साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक घोषित होण्याआधीच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तथापि एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण पुढे करून निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर नवीन उमेदवाराचा शोध सुरू झाला. त्यानंतर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव समोर आले. उमेदवारी अधिकृत घोषणा होण्याआधीच त्यांचे लहान बंधू माजी नगराध्यक्ष आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे नेते अनिल चौधरी यांनी संतोष चौधरींना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासंदर्भात जल्लोष केला. शरद पवारांनी संतोष चौधरींच्या नावाला हिरवा कंदील दिला असल्याचे सांगितल्याने भुसावळात कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. त्यानंतर दहा-बारा दिवस झाले तरी अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसल्याने चौधरी गोटात एक प्रकारे नैराश्य पसरले आहे. त्यानंतर आता रावेर लोकसभेसाठी उद्योगपती श्रीराम पाटील यांचे नाव नव्याने चर्चेत आले असून त्या नावावर जणू शिक्का मोर्तब होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. उद्योगपती श्रीराम पाटील हे दोनच महिन्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले व्यक्ती आहेत. कसलेही अट अथवा शर्थ न घालता श्रीराम पाटलांनी भाजपा प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपतर्फे त्यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु त्यांचा डोळा आगामी विधानसभा निवडणुकीवर होता आणि आहे. परंतु रावेर लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना एकनाथ खडसेंनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावच्या मेळाव्यात शरद पवारांच्या उपस्थितीत रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या नावाची घोषणा केली होती. त्याला एकनाथ खडसेंनी सुद्धा मान्यता देऊन निवडणुकीच्या तयारीला लागले होते. तथापि त्यांच्या सुनबाई विद्यमान भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याची घोषणा केली. भाजपची यादी जाहीर झाली आणि त्यानंतर एकनाथ खडसेंनी प्रकृतीचे कारण देऊन काढता पाय घेतला त्यानंतर त्यांची कन्या एडवोकेट रोहिणी खडसे यांनी रावेर मतदार संघातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे पुढे आला. बारामती मध्ये ननंद भावजय मधील लोकसभा निवडणूक लढली जात आहे. याच धरतीवर रावेरमधून रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे या ननंद भावजाई मध्ये सामना रंगेल, असे चित्र निर्माण केले गेले. तथापि रोहिणी खडसेंनी मी विधानसभा लढण्याची तयारी करते आहे. मी लोकसभा लढणार नाही, असे जाहीर करून रोहिणी खडसेंनी ही निवडणूकीतून माघार घेतली आणि त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तुल्यबळ उमेदवार देण्याचा तिढा निर्माण होऊन तो अद्याप सुटलेला नाही..

 

रावेरचे रहिवासी उद्योगपती श्रीराम पाटील हे गेल्या दहा वर्षापासून आमदारकी अथवा खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याची त्यांची इच्छा आहे. यावर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही पक्षाने त्यांना रावेर लोकसभेचे उमेदवारी दिली, तर रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविणार. जर कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून रावेर विधानसभेची निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. दरम्यान अचानक दोन महिन्यांपूर्वी श्रीराम पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच भाजपने जे सांगेल तसे काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यांना माहीत होते की लगेच २०२४ च्या लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळणार नाही. आगामी विधानसभेसाठी त्यांची इच्छा होती. परंतु लोकसभेसाठी यावेळी माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना २०२४ च्या लोकसभेची उमेदवारी मिळेल आणि त्यानंतर रावेर विधानसभा आपल्याला मिळेल असा त्यांचा कयास असावा. कदाचित रक्षा खडसेंना भाजपने पुन्हा उमेदवारी देऊन सर्व समीकरण बिघडवले त्यामुळे आता येत्या विधानसभेसाठी भाजपतर्फे अमोल जावळे हे दावेदार राहतील यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्योगपती श्रीराम पाटील यांचे नाव पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. आणि त्या नावावर शिक्का मोर्तब होईल, असे सांगण्यात येते. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील यांचे नावही आघाडीवर होते. तथापि रक्षा खडसे ला भाजपतर्फे उमेदवारी दिल्याने डॉक्टर केतकी पाटील यांचेही नाव मागे पडले. त्यामुळे आता उद्योगपती श्रीराम पाटलांचा नावाची जोरदार चर्चा आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील जातनिहाय मतदानाची टक्केवारी पाहता मराठा समाजाच्या मतदारांची टक्केवारी एक नंबर वर आहे. त्यानंतर दलित, लेवा, मुस्लिम, बाकी इतर समाजाचे मतदार आहेत. मराठा समाज, दलित आणि मुस्लिम समाजाची मते एकत्र मिळविण्यात यश आले तर मराठा समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. म्हणून श्रीराम पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.